पाचच दिवसापूर्वी प्रियकरासोबत रहायला आली आणि आयुष्याला मुकली, हत्येचे कारण अद्याप गुलदस्त्यात
विकी देवकाते आणि लक्ष्मी तायडे हे दोघेही मूळचे अकोला जिल्ह्यातील रहिवासी आहेत. पाच दिवसांपूर्वीच हे दोघे अकोल्याहून अंबरनाथमधील नेवाळी परिसरात रहायला आले होते.
अंबरनाथ : अज्ञात कारणातून प्रियकरानेच प्रेयसीचा गळा आवळून हत्या केल्याची घटना अंबरनाथ तालुक्यातील नेवाळी गावात उघडकीस आली आहे. या घटनेप्रकरणी हिललाईन पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली आहे. लक्ष्मी तायडे असे मयत प्रेयसीचे नाव आहे, तर विकी देवकाते असे आरोपी प्रियकराचे नाव आहे. अंबरनाथ तालुक्यातील नेवाळी परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे.
पाच दिवसांपूर्वीच अकोल्याहून अंबरनाथला आले होते
विकी देवकाते आणि लक्ष्मी तायडे हे दोघेही मूळचे अकोला जिल्ह्यातील रहिवासी आहेत. पाच दिवसांपूर्वीच हे दोघे अकोल्याहून अंबरनाथमधील नेवाळी परिसरात रहायला आले होते.
लक्ष्मीचे आधीच लग्न झाले होते
लक्ष्मी हिचे आधीच लग्न झाले होते. मात्र तिचे पतीसोबत वाद झाल्याने ती त्याच्यापासून वेगळी राहत होती. यानंतर तिचे विकी देवकातेसोबत प्रेमसंबंध जुळले आणि ती विकीसोबत अकोल्याहून अंबरनाथमध्ये रहायला आली.
लक्ष्मीची हत्या करुन आरोपी फरार
अंबरनाथमध्ये येऊन या जोडप्याला पाचच दिवस झाले होते. पाचच दिवसात विकीने गळा आवळून लक्ष्मीची हत्या केली आणि तेथून फरार झाला. आज सकाळी हत्येची घटना उघडकीस आल्याननंतर हिललाईन पोलिसांना याची माहिती देण्यात आली.
घटनेची माहिती मिळताच हिललाईन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करुन लक्ष्मीचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला.
हिललाईन पोलिसात हत्येचा गुन्हा दाखल
हिललाईन पोलिसांनी विकी देवकाते याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस फरार विकीचा शोध घेत आहेत. विकीने ही हत्या नेमकी कोणत्या कारणातून केली याबाबत अद्याप माहिती मिळू शकली नाही.
विकीला अटक झाल्यानंतरच हत्येबाबत खुलासा होईल, असे उल्हासनगर विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त मोतीचंद राठोड यांनी सांगितले.