जुना वाद उफाळून आला, भररस्त्यात तरुणाला संपवले, घटना सीसीटीव्हीत कैद
डोंबिवलीत गुन्हेगारी सत्र थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. या घटनांमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
डोंबिवली : सांस्कृतिक शहर असलेल्या डोंबिवलीची आता गुन्हेगारीचं शहर अशी ओळख निर्माण होत आहे. दररोज या ना गुन्हेगारी घटनांनी डोंबिवली शहर चर्चेत येत असतं. आता हत्येच्या घटनेने पुन्हा एकदा डोंबिवली पुन्हा चर्चेत आली आहे. जुन्या वादातून काल मध्यरात्री एका तरुणाची हत्या केल्याची घटना टाटा नाका परिसरात उघडकीस आली आहे. मानपाडा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीला अटक करण्यात आली आहे. किरण शिंदे असे अटक आरोपीचे नाव आहे. तर शैलेश शीलवंत असे मयत तरुणाचे नाव आहे. पोलीस पुढीर कारवाई करत आहेत. डीसीपी सचिन गुंजाळ, एसीपी सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली मानपाडा पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी सुनील तारमाळे यांच्या पथकाने तपास करत आरोपीला बेड्या ठोकल्या.
काय आहे प्रकरण?
मयत शैलेश हा रिक्षाचालक असून, आधीपासूनच तो आरोपी किरण शिंदेला ओळखत होता. दोघांमध्ये शनिवारी रात्री काही कारणातून किरकोळ वाद झाला होता. यानंतर दोघेही निघून गेले. मात्र किरणच्या मनात राग उफाळत होता. यातूनच त्याने दुसऱ्या दिवशी टाटा नाका परिसरात शैलेशला गाठले. किरणने शैलेशवर चाकूने वार केले. जखमी अवस्थेत स्वतःच्या बचावासाठी शैलेशने पळण्याचा प्रयत्न केला. मात्र किरणने त्याचा पाठलाग सोडला नाही.
अखेर भरपूर रक्तस्त्राव झाल्याने शैलेशचा जागीच मृत्यू झाला. यानंतर आरोपी पळून गेला. आरोपी पीडितेचा पाठलाग करताना सीसीटीव्हीत कैद झाला होता. घटनेची माहिती मिळताच मानपाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतेदह ताब्यात घेतला. घटनास्थळाचा पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता आरोपी सीसीटीव्हीत कैद झाला होता. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी तासाभरात आरोपीला अटक केली आहे.