Gondia Farmer Death : जमिनीचा वाद टोकाला गेला, काका-पुतण्याने शेतकऱ्याला आयुष्यातूनच उठवला !
कोयलारी गावातील हिरालाल मेश्राम आणि ताराचंद पुस्तोडे यांच्यात नेहमी जमिनीच्या वादातून भांडण होत असे. नेहमीप्रमाणे गुरुवारी देखील ताराचंद पुस्तोडे आणि त्याचा पुतण्या विनोद पुस्तोडे यांनी हिरालाल मेश्राम यांच्याशी जमिनीच्या कारणावरून वाद घातला.
गोंदिया : जमिनीच्या वादातून काका पुतण्याने मिळून शेतकऱ्याची हत्या केल्याची खळबळजनक घटना गोंदियात घडली आहे. देवरी पोलीस स्टेशनअंतर्गत येत असलेल्या कोयलारी शेंडा गावात ही घटना घडली आहे. आरोपींनी आधी शेतकऱ्याच्या अंगावर ट्रॅक्टर घातला, मग कुऱ्हाडीने वार करून त्याची हत्या केली. तर शेतकऱ्याचा मुलगा जखमी झाला आहे. हिरालाल मेश्राम असे हत्या करण्यात आलेल्या 55 वर्षीय शेतकऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी देवरी पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. ताराचंद पुस्तोडे आणि विनोद पुस्तोडे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
आरोपी आणि मयत शेतकरी यांच्या जमिनीवरुन वाद होता
कोयलारी गावातील हिरालाल मेश्राम आणि ताराचंद पुस्तोडे यांच्यात नेहमी जमिनीच्या वादातून भांडण होत असे. नेहमीप्रमाणे गुरुवारी देखील ताराचंद पुस्तोडे आणि त्याचा पुतण्या विनोद पुस्तोडे यांनी हिरालाल मेश्राम यांच्याशी जमिनीच्या कारणावरून वाद घातला.
जमिनीच्या वादातून शेतकऱ्याच्या अंगावर ट्रॅक्टर चढवला
वाद इतका विकोपाला गेला की, रागाच्या भरात ताराचंद पुस्तोडे आणि विनोद पुस्तोडे यांनी हिरालाल मेश्राम यांच्या अंगावर ट्रॅक्टर चढवून डोक्यावर कुऱ्हाडीने वार करत त्याची हत्या केली. यात हिरालाल मेश्राम यांचा जागीच मृत्यू झाला.
शेतकऱ्याचा मुलगा जखमी
तसेच या भांडणात हिरालाल मेश्राम यांचा मुलगा जखमी झाल्याने त्याला देवरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरीता दाखल करण्यात आले आहे. देवरी पोलिसांनी आरोपींना अटक केली असून, देवरी पोलीस पुढील तपास करीत आहे.