आजारी मुलगा झोपला होता, इतक्यात वडील आले, काही कळण्याआधीच त्यांनी मुलासोबत…
पुण्याच्या हडपसर परिसरात तुकाईदर्शन येथे आरोपी, त्याची पत्नी आणि मुलगा यांच्यासह भाड्याच्या घरात रहात होता. मुलाची आई धुणे-भांडी करायची तर आरोपी पिता हा हमालीची कामे करायचा.
पुणे : लहान असताना आपल्या मुलांचे नको तितके लाड करतो. कोडकौतुक करतो. पण, त्या मुलांबाबत काही अनिष्ट करण्याचं धाडस कधीच करू शकत नाही. मात्र, पुण्यातील हडपसर भागात रहाणाऱ्या एका वडिलांनी बाप – मुलाच्या नात्याला काळिमा फासण्याचे कृत्य केले. मुलगा आजारी असल्याने तो घरत झोपला होता. बापाने ही संधी साधली आणि ते कृत्य केले. वडिलांचे हे धक्कादायक कृत्य पाहून पोलिसही चक्रावले आणि त्यांनी त्या नराधम बापाला अटक केली. हा बाप हमालीची कामे करत होता.
पुण्याच्या हडपसर परिसरात तुकाईदर्शन येथे आरोपी, त्याची पत्नी आणि मुलगा यांच्यासह भाड्याच्या घरात रहात होता. मुलाची आई धुणे-भांडी करायची तर आरोपी पिता हा हमालीची कामे करायचा. त्यांचा २८ वर्षाचा मुलगा हा सतत आजारी असायचा. वारंवार आजारी पडत असल्यामुळे त्याला मिळणारी नोकरीही टिकत नसे.
मुलाच्या सततच्या आजारपणाला वडील कंटाळले होते. हमालीची कामे त्यातून मिळणारे कमी उत्पन्न यामधून घर खर्च चालवायचा की मुलाच्या आजारपणाचे उपचार करायचे असा प्रश्न त्या पित्यासमोर नेहमी उभा असायचा.
आजारपणामुळे तो मुलगा कालही घरामध्ये दिवाणवर झोपला होता. मुलाची आई घरकामासाठी बाहेर गेली होती. दुपारचे साडेबारा वाजले होते. ही संधी सोडून त्या पित्याने त्याचा गळा दाबून खून केला. खून केल्यानंतर तो मुलाच्या मृतदेहासमोरच बसून राहिला.
घरकाम करून आल्यानंतर त्या आईने ही घटना पाहताच तिला धक्का बसला. झाल्या घटनेची तिने हडपसर पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त विक्रांत देशमुख, वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद गोकुळे यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी त्या पित्याकडे चौकशी केली असता आपला मुलगा हा वारंवार आजारी होता. काहीही कामधंदा करत नव्हता. त्यामुळे त्याच्या उपचाराचा खर्च करणे शक्य होत नसल्याने हे कृत्य केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्या पित्याला अटक केली असून त्याची अधिक चौकशी सुरु आहे.