दारुड्या पतीच्या जाचाला कंटाळली, अखेर ‘असा’ काढला पतीचा काटा
करंजी पाचदेवडी भागात दगडू सुरवाडे आपली पत्नी आशा सुरवाडे आणि दोन मुलांसह राहतात. ते शेती आणि मजुरीचे काम करत होते.
जळगाव : सतत दारू पिऊन नशेमध्ये पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत अर्वाच्य भाषेत बोलणाऱ्या पतीचा पत्नीने डोक्यात विळ्याने वार करून हत्या केल्याची घटना जळगावमध्ये घडली आहे. जळगावातील बोदवड तालुक्यातील पाचदेवडी येथे रविवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी मुलीच्या फिर्यादीवरून वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयित पत्नीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
सुरवाडे कुटुंबीय शेती आणि मजुरीचे काम करायचे
दगडू सुरवाडे असे हत्या करण्यात आलेल्या पतीचे नाव आहे. तर आशा सुरवाडे असे हत्या करणाऱ्या आरोपी पत्नीचे नाव आहे. करंजी पाचदेवडी भागात दगडू सुरवाडे आपली पत्नी आशा सुरवाडे आणि दोन मुलांसह राहतात. ते शेती आणि मजुरीचे काम करत होते.
पतीला दारुचे व्यसन होते
दगडू यांना दारुचे व्यसन होते. ते रोज दारु पिऊन पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत अर्वाच्य भाषेत तिला बोलायचे. रविवारी सायंकाळी देखील दगडू कामावरुन परतल्यानंतर दारु पिऊन घरी आले. त्यानंतर त्यांच्यामध्ये आणि त्यांच्या पत्नीमध्ये भांडण झाले.
पतीच्या त्रासाला कंटाळून पत्नीने केली हत्या
पतीच्या या रोजच्या त्रासाला कंटाळलेल्या पत्नी आशाने पती दगडू सुरवाडे यांच्या डोक्यात विळ्याने वार केले. यात दगडू सुरवाडे यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी मुलीच्या फिर्यादीवरून वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मयताचे शवविच्छेदन वरणगाव येथील ग्रामीण रुग्णालय येथे करण्यात आले आहे. घटनेनंतर पोलिसांनी संशयित आशा हिस ताब्यात घेत अटक केली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आशिष कुमार अडसूळ यांच्या मार्गदर्शक मनोहर पाटील करीत आहे.