पतीचे दुसऱ्या महिलेशी अनैतिक संबंध, वारंवार समजावूनही दोघेही ऐकत नव्हते, मग…
दोन मुलांचा पिता असलेल्या व्यक्तीचे दुसऱ्या महिलेशी अनैतिक प्रेमसंबंध होते. पत्नीने वारंवार समज देऊनही दोघेही आपले अनैतिक संबंध तोडायला तयार नव्हते.
गिरिडीह : एखादा कृत्याबद्दलचा संताप अनावर झाला की मग महिलाही टोकाचा निर्णय घेऊ लागते. प्रसंगी अनेक महिला गुन्हेगारी कट कारस्थाने रचण्यातही मागे पाहत नाहीत. झारखंड राज्यातील गिरिडीह जिल्ह्यामध्ये घडलेल्या घटनेने याची प्रचिती आणून दिली आहे. पतीच्या विवाहबाह्य संबंधाला वैतागलेल्या महिलेने पतीच्या प्रेयसीचा अत्यंत पद्धतशीरपणे कट रचून काटा काढला. प्रेयसी पतीचा पिच्छा सोडत नसल्याच्या रागातून पत्नीने त्या प्रेयसीची हत्या करण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट किलरला सुपारी दिली. पती आणि त्याच्या प्रेयसीला वारंवार तंबी देण्यात आली होती. त्यानंतरही प्रेयसीने पतीचा नाद सोडला नाही. त्यामुळे महिलेने टोकाचा निर्णय घेत पतीच्या प्रेयसीची हत्या घडवून आणली. महिलेचा मृतदेह सापडल्यानंतर नऊ दिवसांनी या धक्कादायक कटाचा उलगडा झाला आहे. या प्रकरणात पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली आहे. त्यामध्ये एका अल्पवयीन मुलाचाही सहभाग आहे.
हत्या केल्यानंतर मृतदेह जंगलात फेकला
पतीच्या प्रेयसीची हत्या घडवून आणल्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने तिचा मृतदेह जंगलात फेकण्यात आला. मात्र पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत अवघ्या नऊ दिवसांतच हत्याकांडाचा धक्कादायक उलगडा झाला. बगोदर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ही घटना घडल्याचे समोर आले आहे. 28 एप्रिल रोजी दोभाचांच जंगलात एका महिलेचा झाडाला बांधलेला मृतदेह आढळून आला होता. कुंती देवी असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी महिलेचा पती राजेंद्र शहा याच्या लेखी अर्जावरून बगोदर पोलिसांनी अज्ञात गुन्हेगारांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला होता.
या प्रकरणाचा तपास करण्यासाठी गिरिडीहचे पोलीस अधीक्षक अमित रेणू यांनी विशेष तपास पथक स्थापन केले होते. या विशेष तपास पथकाने महिलेच्या हत्याकांडामागील धक्कादायक कारण उजेडात आणल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे.
तांत्रिक तपासाद्वारे हत्याकांडाचा उलगडा
मृत कुंती देवी ही रोजंदारीवर काम करीत होती. विशेष तपास पथकाने ही महिला मागील काही दिवसांपासून कुठे वावरत होती, याचा शोध घेतला. तिच्या मोबाईलवरील कॉल रेकॉर्ड तपासण्यात आले. तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. याचदरम्यान 24 एप्रिल रोजी कुंती ही दुसऱ्या एका महिलेसोबत फिरत होती, असे आढळले. ती महिला कुलगो येथील रहिवासी नीलकंठ महतोची पत्नी मीना देवी असल्याचे उघडकीस आले.
अधिक तपास सुरू ठेवला असता मीना देवी हिने कुंतीच्या हत्येचा कट यशस्वी केल्याची माहिती पुढे आली. मीना हिने कॉन्ट्रॅक्ट किलर अजय कुमार याला कुंतीची हत्या करण्यासाठी सुपारी दिली होती. या प्रकरणात मीना आणि अजय कुमार या दोघांची सखोल चौकशी सुरू ठेवण्यात आली. या चौकशीमध्ये सहा आरोपींची नावे समोर आली. त्या अनुषंगाने सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. यामध्ये एका अल्पवयीन आरोपीचाही सहभाग आहे.