गुलाब जामनंतर आता ‘या’ पदार्थावरुन लग्नात राडा, भरमंडपात दोन पक्ष भिडले !
लग्नसमारंभात कशावरुन वाद होईल सांगता येत नाही. अशीच एक विचित्र घटना सध्या उघडकीस आली आहे. या घटनेत भरमंडपात राडा झाल्याने चार जण जखमी झाले आहेत.
गिरीडीह : आतापर्यंत लग्न समारंभात मानपान, देण्या-घेण्यावरुन वाद झालेले पाहिले होते. पण आता खाण्याच्या पदार्थांवरुनही लग्नात हाणामारी होत असल्याच्या घटना घडत आहेत. अशीच एक घटना झारखंडमध्ये उघडकीस आली आहे. झारखंडमधील गिरिडीहमध्ये एका लग्न समारंभात गरमागरम पुरी न मिळाल्याने राडा झाल्याची घटना घडली. वाद इतका वाढला की दोन्ही पक्षांमध्ये जोरदार वादावादी झाली. मग वादाचे हाणामारीत रुपांतर झाले. यात चार जण जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी लग्नमंडपात धाव घेत एका तरुणाला ताब्यात घेतले. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
पोलिसांनी वेळीच धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली
गिरिडीहच्या मुफसिल पोलीस स्टेशन हद्दीतील पात्रोडीह सेंट्रल पीठ येथे काल रात्री काही तरुणांनी लग्नसमारंभात गोंधळ घातला. यावेळी दगडफेकीसह धारदार शस्त्रांचाही वापर करण्यात आला. यामध्ये चार तरुण जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत परिस्थिती नियंत्रणात आणली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत एसडीपीओ अनिल कुमार सिंह, मुफसिल पोलीस स्टेशनचे प्रभारी कमलेश पासवान, नगर पोलीस स्टेशनचे प्रभारी आरएन चौधरी, पोलीस निरीक्षक विनय कुमार राम देखील पोलीस दलासह घटनास्थळी पोहोचले.
रात्री 2 वाजता केली तरुण गरम पुरीची मागणी
पात्रोडीह येथील शंकर नावाच्या व्यक्तीच्या घरी मिरवणूक आली होती. दरम्यान, रात्री दोन वाजण्याच्या सुमारास एक तरुण जेवणासाठी पोहोचला आणि गरम पुरीची मागणी करू लागला. यानंतर हा संपूर्ण वाद निर्माण झाला. यानंतर तरुण बाहेरून काही साथीदारांना घेऊन आला अन् लग्नमंडपात गोंधळ घातला. तसेच शिवीगाळ करून दगडफेकही केली. याप्रकरणी पोलीस कारवाई करत आहेत.