वंशाचा दिवा दिला नाही म्हणून सासू हिणवायची, अखेर सूनेच्या सहनशक्तीचा अंत झाला, मग…
सासू-सुनेमध्ये दररोज भांडण व्हायचे. सुनेला मुलगा झाला नाही म्हणून सासू वाद घालायची. अखेर एके दिवशी सुनेच्या सहनशक्तीचा अंत झाला अन् मोठा अनर्थ घडला.
गुमला : सुनेला मुलगा झाला नाही म्हणून सासू-सुनांमध्ये दररोज भांडण व्हायचे. या भांडणाला कंटाळलेल्या सुनेचा संतापाचा पारा चढला अन् नको ते घडून गेले. सुनेने सासूला जबर मारहाण केली. यानेही सुनेचे मन भरले नाही म्हणून तिची हत्याच केली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी सुनेला अटक केली आहे. झारखंडमधील गुमला जिल्ह्यातील चैनपूर येथील दात्रा गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. ओदिल केरकेट्टा असे आरोपी सुनेचे नाव आहे, तर बिबयानी केरकेट्टा असे मयत सासूचे नाव आहे. महिलेला तीन मुली आहेत. पोलिसांनी हत्येत वापरलेले हत्यारही जप्त केले आहे.
सासू-सुनांचा वाद विकोपाला गेला
गुरुवारी सायंकाळी मयत महिलेचा मुलगा जयमन केरकेट्टा बाजारात गेला होता. दरम्यान, वृद्ध सासू बिबयानी केरकेट्टा आणि सून ओदिल केरकेट्टा यांच्यात काही कारणातून वाद झाला. दोघांमधील वाद इतका वाढला की, सून ओडिलेने भयंकर पाऊल उचलले आणि आपल्या 65 वर्षीय सासूला मारहाण करत संपवले.
मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची तयारी सुरु होती तितक्यात…
घटनेनंतर कुटुंबीयांनी हे प्रकरण दाबण्यासाठी मृत महिलेवर अंत्यसंस्कार करण्याची तयारी केली होती. दरम्यान, एका ग्रामस्थाने चैनपूर पोलीस पोलिसांना हत्येप्रकरणी माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी दातरा गावात पोहोचून, मृत महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी गुमला सदर रुग्णालयात पाठवला. पोलीस प्रशासनाकडून आरोपी सुनेला कठोरात कठोर शिक्षा करण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत.