नेहमीप्रमाणे शिकवणीच्या कामाला गेली, मात्र पुन्हा परतलीच नाही; मग शोधाशोध केली असता थेट…
शाळेत शिक्षका असणारी तरुणी नेहमीप्रमाणे शाळेत जाण्यासाठी घरुन निघून गेली. मात्र ती शाळेत पोहचलीच नाही. नेहमीची वेळ होऊन गेली तरी तरुणी घरीही परतली नाही.
कोडरमा : झारखंडमध्ये गुरु-शिष्याच्या नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. एकतर्फी प्रेमातून शिक्षकाने आपल्या माजी विद्यार्थिनीला संपवल्याची घटना झारखंडच्या कोडरमा जिल्ह्यात घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी शिक्षकासह पाच जणांना अटक केली आहे. शिक्षकाच्या प्रेमाला तरुणी प्रतिसाद देत नसल्याने संतापलेल्या शिक्षकाने सुपारी देऊन तिची हत्या केली. दिपक साव असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे. तो तरुणीचे ट्युशन घ्यायचा. यादरम्यान तो तिच्या प्रेमात पडला. त्याने अनेकवेळा तरुणीला आपल्या भावना बोलून दाखवल्या, मात्र तरुणी नकार देत होती.
नेहमीप्रमाणे शाळेत शिकवणीसाठी गेली ती परतली नाही
पीडित तरुणी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर एका खाजगी शाळेत शिक्षकाची नोकरी करत होती. 21 मार्च रोजी नेहमीप्रमाणे तरुणी घरुन शाळेत जाण्यासाठी निघाली. मात्र त्यानंतर ती घरी परतलीच नाही. घरच्यांनी तिचा खूप शोध घेतला, मात्र ती कुठेही सापडली नाही. त्यानंतर घरच्यांनी पोलीस ठाण्यात तरुणीची मिसिंग तक्रार दाखल केली.
तपासादरम्यान हत्येचा उलगडा
पोलिसांनी तरुणीचा शोध सुरु केला. यावेळी तपासादरम्यान संशयाच्या आधारे एक सुमो गाडी पोलिसांनी जप्त करत गाडीच्या मालकाला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान पोलिसांनी या घटनेशी संबंधित शिक्षकासह अन्य एकाला ताब्यात घेतले. आरोपींना पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी आरोपींनी सांगितल्याप्रमाणे खदानीजवळ पाहिले असता तरुणीचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला.
यानंतर पोलिसांनी आरोपींची पुन्हा चौकशी केली असता दिपक साव यानेच तरुणीची सुपारी देऊन हत्या केल्याचे उघड झाले. दिपक साव हा तरुणीचे ट्युशन घ्यायचा. यादरम्यान तो तिच्या प्रेमात पडला. अनेकदा तरुणीकडे त्याने प्रेमाची कबुली देत प्रपोज केले. मात्र तरुणी त्याला नकार देत होती. याच कारणातून त्याने तरुणीची हत्या केली.