भाजीपाल्याच्या टेम्पोमधून सुरू होती गोमांस तस्करी, पोलिसांनी ‘असा’ केला पर्दाफाश
कल्याण कोळशेवाडी पोलिसांना नाशिकवरून जोगेश्वरी परिसरात मोठ्या प्रमाणात गोमांस तस्करी होणार असल्याची माहिती कल्याण कोळसेवाडी पोलिसांना मिळाली होती.
कल्याण : भाजीपाल्याच्या पिकअप टेम्पोमध्ये नाशिकवरून मुंबईला विक्रीसाठी जाणारे सुमारे दोन हजार किलो गोमांस (Beef) कल्याण कोळसेवाडी पोलिसांनी (Kolsewadi Police) जप्त केले. याप्रकरणी पिकअपच्या चालकाला अटक केली आहे. इम्तिहाज फैयाज सय्यद असे या आरोपीचे नाव असून झटपट पैसे कमवण्यासाठी आरोपी ही तस्करी (Smuggling) करत होता.
गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला
कल्याण कोळशेवाडी पोलिसांना नाशिकवरून जोगेश्वरी परिसरात मोठ्या प्रमाणात गोमांस तस्करी होणार असल्याची माहिती कल्याण कोळसेवाडी पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस ठाण्याचे एपीआय उल्हास जाधव यांच्या नेतृत्वाखाली कोळशेवाडी पोलिसांनी कल्याण काटे मानिवली नाक्यावर सापळा लावला.
संशयित टेम्पो तपासणी केली असता गोमांस आढळले
काटेमानवली नाक्यावर दबा धरुन बसलेल्या पोलिसांना एक संशयित टेम्पो नाशिककडून मुंबईच्या दिशेने येत असल्याचे दिसले. पोलिसांनी हा टेम्पो थांबवला आणि त्या टेम्पोची कसून तपासणी केली.
तपासणीत त्या टेम्पोत दीड ते दोन हजार किलो गोमांस असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. यानंतर पोलिसांनी टेम्पोसह हे गोमांस ताब्यात घेतले. तसेच टेम्पो चालकालाही ताब्यात घेतले.
आरोपीची कसून चौकशी सुरु
पोलिसांनी गोमांस तस्करी करणाऱ्या टेम्पो चालकाला बेड्या ठोकल्या. पोलिसांनी या आरोपीकडून दोन हजार किलो गोमांस जप्त केले आहे.
आरोपी हे गोमांस नाशिकमधून कुणाकडून हस्तगत करत होता आणि मुंबईत कोणाकडे डिलिव्हर करणार होता, याबाबत अद्याप माहिती मिळू शकली नाही. कोळशेवाडी पोलीस आरोपीची कसून चौकशी करत आहेत. चौकशीअंतीच या बाबी उघड होतील.