डोक्यातील संशयाचं भूत जात नव्हतं, मुलीला खोलीत झोपवलं, मग हॉलमध्ये जे घडले त्याने संपूर्ण शहरच हादरलं !
पती पेशाने शिक्षक होता. मात्र विद्यार्थ्यांना ज्ञानाचे धडे देणारा शिक्षक पत्नीसाठी मात्र हैवान ठरला. शिक्षकाचे कृत्य पाहून सर्व हैराण झाले आहेत.
महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर : चारित्र्याच्या संशयातून एका शिक्षकाने आपल्या पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना लातूरमध्ये घडली आहे. शामल सूर्यवंशी असे मयत महिलेचे नाव आहे. पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी घरातून पळून गेला. याप्रकरणी अमहदपूर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस फरार आरोपीचा शोध घेत आहेत. वैजनाथ सूर्यवंशी असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे. सकाळी दूधवाला घरी दूध घेऊन आल्यानंतर घटना उघडकीस आली.
निलंगा तालुक्यातील रहिवासी असलेल्या वैजनाथ सूर्यवंशी याची 2011 मध्ये परभणीतून लातूरमधील अहमदपूर तालुक्यात बदली झाली होती. सध्या तो अहमदपूर तालुक्यातील खंडाळी जिल्हा परिषद शाळेत कार्यरत आहे. तर अहमदपूरमधील राजसारथी कॉलनीत पत्नी आणि दोन मुलींसह राहतो. काही दिवसापूर्वी त्याने आपल्या मोठ्या मुलीला भावाकडे शिक्षणासाठी पाठवले होते. त्यामुळे पती-पत्नी आणि 9 वर्षाची छोटी मुलगी असे तिघेच राहत होते.
चारित्र्याच्या संशयातून पत्नीला संपवले
वैजनाथला पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. यातून त्यांच्यामध्ये सतत वाद होत होते. पतीच्या रोजच्या त्रासाला कंटाळून पतीविरोधात तक्रारही दाखल केली होती. मात्र नातेवाईकांनी मध्यस्थी करुन समजूत काढल्यामुळे तिने तक्रार मागे घेतली होती. मात्र वैजनाथ ही गोष्ट विसरला नव्हता. त्याने शांत डोक्याने पत्नीच्या हत्येचा कट रचला.
पत्नीची हत्या करुन आरोपी फरार
प्लाननुसार वैजनाथने शुक्रवारी रात्री जेवण आटोपल्यानंतर लहान मुलीला आतल्या खोलीत झोपवले. पती-पत्नी हॉलमध्ये झोपले होते. मध्यरात्री वैजनाथने आधी पत्नीची धारदार शस्त्राने हत्या केली, मग उकळते तेल अंगावर टाकले. पत्नीचा मृत्यू झाल्याची खात्री पटताच त्याने दरवाजा ओढून घेतला आणि तो फरार झाला.
मेव्हण्याच्या फिर्यादीवरुन आरोपीविरोधात गुन्हा दाखल
नेहमीप्रमाणे सकाळी दूधवाला घरी आला. त्याने आवाज देऊनही आतून प्रतिसाद मिळाला नाही. म्हणून त्याने दार लोटले तर समोर रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह पडलेला दिसला. त्याने तात्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेत तपास सुरु केला. याप्रकरणी महिलेचा भाऊ मनोज ढोले याच्या फिर्यादीवरुन अहमदपूर पोलिसांनी कलम 302 अन्वये हत्येचा गुन्हा दाखल केला. पोलीस आरोपीच्या मागावर आहेत.