जुन्या वादातून एका रात्रीत दुहेरी हत्याकांड, उपराजधानीत चाललंय काय?
नागपुरात हत्येचं सत्र थांबण्याचे नावच घेताना दिसत नाही. या ना त्या कारणातून हत्या करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अशी एक घटना काल रात्री उघडकीस आली आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
नागपूर / सुनील ढगे : राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात गुन्हेगारी थांबण्याचे नावच घेताना दिसत नाही. यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. नागपुरात काल एकाच रात्री हत्येच्या दोन वेगवेगळ्या घटनांनी खळबळ उडाली आहे. नागपूर शहरातील यशोधरा नगर आणि पाचपावली पोलीस स्टेशनच्या हद्दीत या हत्या झाल्या आहेत. जुन्या वादातून दोन तरुणांच्य हत्या झाल्याची घटना उघडकीस आली आहे. उमेश नंदेश्वर आणि धिरज चुटेलकर अशी हत्या करण्यात आलेल्या तरुणांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. एका हत्येप्रकरणी पाच आरोपींना अटक केली आहे.
पाचपावली परिसरात पहिली हत्येची घटना
पहिली घटना पाचपावली परिसरातील राणी दुर्गावतीनगर चौकात घडली. जुन्या भांडणातून 25 वर्षीय तरुणाची पाच जणांनी रात्री साडेअकराच्या सुमारास हत्या केल्याची घटना घडली. उमेश नंदेश्वर असे पाचपावलीतील हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. जुन्या भांडणातून ही घटना घडल्याची माहिती मिळते. याप्रकरणी पोलिसांनी 5 जणांना अटक केली आहे.
विनोबा भावे नगरमध्ये हत्येची दुसरी घटना
दुसरी घटना यशोधानगर येथील विनोबा भावेनगर परिसरात घडली आहे. या घटनेत जुन्या वादातून दोघा तरुणांवर चाकूहल्ला झाल्याची घटना घडली. या घटनेत एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी आहे. धिरज चुटेलकर असे मयत तरुणाचे नाव असून, राजेश मन्ने असे गंभीर जखमी तरुणाचे नाव आहे.
जखमीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर मयत तरुणाचा मृतदेह मेयो रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला. यावेळी मयताच्या नातेवाईकांनी रुग्णालयात गोंधळ घातला होता. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींचा शोध सुरू आहे.