अख्या गावाला भुतानं झपाटलं ? घर दार सोडून गावकरी कुठं गेले? डोकं बधिर करणारी धक्कादायक घटना आहे तरी काय?
आदिवासी समाजातील नागरिकांच्या मानगुटीवरुन अजूनही अंधश्रद्धेचे भूत खाली उतरलेले नाही, हे पटवून देण्यासाठी इगतपुरी तालुक्यातील भोरवाडी येथील धक्कादायक घटना पुरेशी आहे.
इगतपुरी, नाशिक : पुरोगामी महाराष्ट्रात (Maharashtra News) अजूनही अंधश्रद्धेचे (Superstition) भूत कायम असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नाशिकच्या इगतपुरी (Nashik Igatpuri) तालुक्यातील भोरवाडी येथील हा प्रकार आहे. एका मुलाचा मृत्यू हा भुताटकीने झाल्याचा संशय घेऊन आठ कुटुंबांना गाव सोडण्यापासून प्रवृत्त करण्यात आले आहे. आठ कुटुंबांनी आनंदाने सुरू असलेला संसार पाठीवर घेत घरांची मोडतोड करून दुसऱ्या गावाची वाट धरली आहे. हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानं संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून अंधश्रद्धा निर्मूलन समितीनेही कठोर कारवाईची मागणी केली आहे. त्यावरून नाशिक पोलीसांनीही याची दखल घेतली आहे.
नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील आदिवासी समाजाच्या मानगुटीवर असलेले अंधश्रद्धेचे भूत अजूनही खाली उतरले नाही हे पटवून देण्यासाठी भोरवाडीचं उदाहरण ताजं आहे.
भोरवाडी येथील तब्बल आठ कुटुंबाने आपल्या घरांची मोडतोड करून गाव कायमचे सोडून देण्याचा निर्णय घेत आपला संसार पाठीवर घेऊन दुसऱ्या गावाची वाट धरली आहे.
इगतपुरी येथील भोरवाडी गावात यापूर्वीही भूताटकीच्या मुद्द्यावरून दोन गटात वाद झाला होता. हा वाद पोलीस ठाण्यापर्यन्त पोहचला होता. मात्र पोलीसांनी समजावून सांगूनही त्यामध्ये कुठलीही सुधारणा झाली नाही.
नुकताच एका मुलाचा अचानक मृत्यू झाल्याने भुताटकीचा संशय व्यक्त करण्यात आला होता. यामध्ये मुलाचा मृत्यू झाल्याने दोन गटात मोठा राडा झाला होता.
त्यातील आठ कुटुंबांना गाव सोडून जाण्यासाठी प्रवृत्त करत त्यांना गावाच्या बाहेर काढण्यात आले आहे. त्यामुळे हा धक्कादायक प्रकार बघता आदिवासी समाजातील अंधश्रद्धा अजूनही कायम आहे हे स्पष्ट होत आहे.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीने याबाबत कठोर कारवाईची मागणी केली आहे. याशिवाय नाशिकच्या ग्रामीण पोलीसांनी याबाबत दखल घेतली असली तरी अद्याप गुन्हा दाखल करण्यात आला नाही.
एकीकडे माणूस विज्ञानाच्या जोरावर प्रगती करत असतांना दुसरीकडे अद्यापही आदिवासी भागातील नागरिकांच्या मानगुटीवरुन भूताटकीचे भूत उतरलेले नाही असं बोललं जात आहे.
एकूणच अंधश्रद्धा निर्मूलन समितीने यामद्धये पोलीसांनी तपास करून कठोर कारवाई करावी, गुन्हा दाखल करून अन्याय झालेल्या व्यक्तींना न्याय मिळावा यासाठी पोलीसांनी कारवाई करावी अशीही मागणी केली आहे.
तर दुसरीकडे यापूर्वीही आदिवासी समाजात भूतकाटीच्या अनेक घटना समोर येत असल्याने अंधश्रद्धेबाबत जनजागृती करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. त्यामुळे याबाबत शासन काही भूमिका घेणार का याकडे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.