पैशाचा वाद टोकाला गेला, मग मित्रांनीच मित्राला…, नेमकं प्रकरण काय?
तिघेही एकमेकांचे चांगले मित्र होते. मात्र या मैत्रीत काही कारणाने वाद निर्माण झाले. मग मित्रांनी मित्रासोबत जे केले त्याने मैत्रीच्या नात्यालाच काळिमा फासला.
नारायणगाव/जुन्नर : अनैतिक संबंधातून घडलेल्या आर्थिक व्यवहारातून झालेल्या वादामध्ये दोन मित्रांनी मित्राचा खून केल्याची धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथे घडली. याप्रकरणी नारायणगाव पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने 24 तासांमध्ये दोन्ही आरोपींना अटक केली आहे. नामदेव भुतांबरे असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर प्रियाल उर्फ बंटी गंगाराम खरमाळे आणि देवराम विठ्ठल कोकाटे अशी अटक आरोपींची नावे आहेत. मयत व्यक्ती ही कोतुल तालुका अकोले जिल्हा अहमदनगर येथील रहिवासी आहे. कामानिमित्त गेल्या अनेक दिवसांपासून नारायणगाव येथे वास्तव करत होती.
दोन दिवसापूर्वी आढळला होता अनोळखी मृतदेह
पुणे जिल्ह्यातील नारायणगावमधील खोडद रोड येथे दोन दिवसापूर्वी एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. या मृतदेहावर मारहाण केल्याच्या खुणा असल्याने ही हत्या असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं होतं. या प्रकरणी नारायणगाव पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात आरोपीच्या विरोधात खुणाचा गुन्हा नारायणगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. या व्यक्तीची ओळख पटवणे हे पोलिसांसमोर एक मोठे आव्हान होते.
सोशल मीडियाच्या आधारे मृतदेहाची ओळख पटवली
नारायणगाव पोलिसांनी सोशल मीडियाचा आधार घेत या व्यक्तीचा फोटो प्रसारित केला. सोशल मीडियावर फोटो व्हायरल झाल्यानंतर या व्यक्तीच्या दूरच्या नातेवाईकांनी ओळख पटवली. मयत व्यक्तीची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी तपासाची सूत्रे हातात घेतली. ही व्यक्ती मूळची नगर जिल्ह्यातील असून, कामानिमित्त पुण्यातील नारायणगाव येथे राहत होती. येथे जेसीबी चालक म्हणून काम करत असल्याची माहिती पोलिसांना समजली.
अनैतिक संबंधाच्या पैशाच्या वादातून मित्रांनीच केला घात
घटनेच्या दोन दिवस आधी या मृत झालेल्या व्यक्तीसोबत अजून दोन व्यक्ती खोडद रोडच्या दिशेने जाताना काहींनी पाहिले होते. त्या अनुषंगाने या दोन व्यक्तींचा शोध पोलिसांनी सुरू केला. त्या दोन जणांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं. यामध्ये प्रियाल उर्फ बंटी गंगाराम खरमाळे आणि देवराम विठ्ठल कोकाटे या दोन जणांकडून पोलिसांनी चौकशी सुरू केली. चौकशीत हे तिघेही मित्र असल्याची बाब उघड झाली. त्यांनी प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी सर्व घटना कबूल केली. अधिकचा तपास नारायणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक विनोद धुर्वे करत आहेत.