कुणाकडून छळ व्हायचा, मातेने आधी मुलांची आणि नंतर स्वतःची केली मुक्तता, नेमकं काय घडलं
सततच्या कौटुंबिक छळाला महिला कंटाळली होती. तिच्या घरच्यांनीही तिचा त्रास थांबावा म्हणून अनेकदा प्रयत्न केले. पण तिच्या रोजच्या मरणयातना काही थांबण्याचे नावच घेत नव्हत्या.
बाडमेर : पश्चिम राजस्थानमधील बाडमेर जिल्ह्यात हृदयद्रावक घटना समोर आली आहे. बारमेरच्या सदर पोलीस स्टेशन हद्दीतील गंगासरा गावात एका महिलेने मुलांची हत्या करुन स्वतः जीवन संपवल्याची घटना घडली आहे. आधी आपल्या दोन निरागस मुलांना पाण्याच्या टाकीत टाकले. त्यानंतर घरातील दागिने आणि पैसे जाळून टाकून मोबाईलवर मृत्यूचे स्टेटस टाकून पाण्याच्या टाकीत उडी मारून जीवनयात्रा संपवली. झिमो देवी असे मयत महिलेचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच सदर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तिन्ही मृतदेह टाकीमधून बाहेर काढून जिल्हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले.
मृत्यूपूर्वी मोबाईलवर स्टेटस ठेवले
झिमो देवीच्या मृत्यू प्रकरणी नातेवाईकांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. झिमोचा पती आणि छोटी जाऊ तिला सतत त्रास देत होते, असा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे. यामुळे तिने हे टोकाचे पाऊल उचलले. मृत्यू करण्यापूर्वी महिलेने मोबाईलवर स्टेटस अपडेट केल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. रोख रक्कम आणि दागिने जाळल्याच्या प्रकरणाचीही चौकशी करण्यात येणार आहे.
पती आणि जावेमध्ये अनैतिक संबंध असल्याचा गंभीर आरोप
गेल्या पाच-सहा वर्षांपासून तिचा पती चिमाराम आणि छोट्या जावेकडून सतत छळ होत असल्याचा आरोप महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे. नातेवाईकांनी अनेक वेळा समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र दोघांनीही झिमोदेवीला त्रास देणे थांबवले नाही. पती आणि जावेचे अनैतिक संबंध असल्याचा गंभीर आरोपही मयताच्या नातेवाईकांनी केला आहे.
पतीच्या अनैतिक संबंधाला विरोध केल्याने झिमोचा पती आणि जावेकडून छळ होत असल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. छोट्या वहिनीशी संबंध तुटू नये म्हणून झिमोचा नवरा चिमारामला तिला आपल्या आयुषयातून दूर करायचे होते. यामुळे त्यांनी झिमोच्या हत्येची भीती व्यक्त केली आहे. मुलीला लवकरात लवकर न्याय मिळावा, अशी महिलेच्या नातेवाईकांची मागणी आहे.