तू माझ्या बहिणीच्या मागे का लागला आहेस… मोकळ्या मैदानात तरुणावर सपासप वार; मिरजेत खुनी थरार
सांगलीतील मिरज तालुक्यात एका 19 वर्षीय तरुणावर प्रेम प्रकरणातून चौघांनी हल्ला करीत त्याची निर्घुण हत्या केल्याचा प्रकार रविवारी रात्री घडला. या प्रकरणात दोघा आरोपींना अटक करण्यात पोलीसांना यश आले असले तर अन्य दोन आरोपी पसार झाले असून त्यांचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
सांगली | 15 जानेवारी 2024 : मिरज तालुक्यातील बामणोली येथे एका 19 वर्षीय तरुणाची प्रेम प्रकरणातून चौघांनी चाकू आणि कोयत्याने सपासप वार करुन निर्घुण हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. बामणोली दत्तनगर येथील रहीवासी असलेल्या ओंकार श्रीधर देसाई याला रविवारी रात्री मोकळ्या मैदानात अडवून त्याला शिवीगाळ करीत चौघा तरुणांनी त्याच्यावर हल्ला केला. ओंकार याच्या डोक्यावर तसेच पोटात चौघा तरुणांनी चाकू आणि कोयत्याचे वार केले. त्यानंतर हल्लेखोर पसार झाले. ओंकार रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असताना त्याचा भाऊ आदेश देसाई याने त्याला सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेले. परंतू डॉक्टरांनी तेथे त्याला तपासून मयत घोषीत केले. या प्रकरणात दोन जणांना पोलिसांनी अटक केली असून दोन आरोपी फरार आहेत.
ओंकार देसाई हा खाजगी कंपनीत कामाला होता. रविवारी रात्री तो सव्वा दहाच्या सुमारास तो जेवण करुन आपल्या कुटुंबियासोबत गप्पा मारत असताना त्याला दत्तनगर येथील खुल्या जागेत फोन करुन ओंकार जावीर याने फोन करुन बोलावून घेतले. त्यानंतर जावीरने त्याला .ओंकार जावीर याने देसाई याला ‘ तू माझ्या बहिणीच्या मागे का लागला आहेस ? असा जाब विचारला. यावेळी दोघात शाब्दीक चकमक झाली. त्यावेळी जावीर सोबत असलेल्या सोहम शहाजी पाटील, ज्ञानेश्वर पाटील आणि अन्य एका अनोळखी व्यक्तीने ओंकार याच्या पोटात आणि डोक्यावर सपासप वार करून त्याला गंभीर जखमी केले आणि हल्लेखोर पसार झाले. ओंकार रक्ताच्या थारोळ्यात कोसळला, त्यावेळी त्याच्या भावाने त्याला सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात केले, पण डॉक्टरांनी उपचारापूर्वीच ओंकार याला मयत घोषित केले.
दोघा आरोपींना अटक
या प्रकरणाची माहीती मिळताच कुपवाड पोलिस तत्काळ घटनास्थळी पोहोचले. कुपवाडचे सहाय्यक निरीक्षक अविनाश पाटील यांनी पथकासह घटनास्थळी भेट देऊन तपास केला. ओंकारच्या खुनामागे प्रेमप्रकरणाचे कारण असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. त्यानंतर काही तासांतच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने दोन आरोपीच्या मुसक्या आवळल्या. ज्ञानेश्वर पाटील आणि आणखी एका संशयित आरोपींचा शोध चालू असल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपींना न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश पाटील हे करीत आहेत.