शिक्षकांना तक्रार केली म्हणून अल्पवयीन विद्यार्थ्याचा दोघा भावांवर कोयत्याने हल्ला, कुठे घडली घटना?
शाळेतल्या वादातून शाळकरी मुलाने शाळेबाहेर जे केलं त्याने जिल्हा हादरला आहे. विद्यार्थ्याने जे कृत्य केलं त्याची कुणी कल्पनाही केली नसेल.
सातारा : सातारा जिल्ह्यात एक खळबळ उडवणारी घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. शिक्षकांना नाव सांगितल्याच्या रागातून एका 15 वर्षीय विद्यार्थ्याने दोन विद्यार्थ्यांवर कोयत्याने हल्ला केला. खंडाळा तालुक्यातील शिरवळ गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्या दोघेही विद्यार्थी जखमी झाले आहेत. एका विद्यार्थ्यावर पुणे येथे उपचारासाठी हलवण्यात आले आहे. दुसऱ्या विद्यार्थ्याला शिरवळ येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जखमी विद्यार्थी हे सख्खे भाऊ आहेत. शाळकरी विद्यार्थ्याने उचलेले गुन्हेगारी पाऊल पाहता सर्वांनाच धक्का बसला आहे. पोलिसांनी मुलाला ताब्यात घेतले आहे.
काय घडलं नेमकं?
हे तिन्ही विद्यार्थी सातारा जिल्ह्यात खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील एका खासगी शाळेतील विद्यार्थी आहेत. हल्लेखोर विद्यार्थ्याची पीडितांनी शिक्षकांकडे काही कारणातून तक्रार केली होती. यामुळे मुलगा संतापला होता. याच राग मनात ठेवून संध्याकाळी शाळा सुटल्यानंतर 6 वाजण्याच्या सुमारास आरोपीने दोघा भावाने अडवले. यानंतर त्यांच्यावर कोयत्याने जीवघेणा हल्ला केला.
दोन्ही जखमी विद्यार्थ्यांवर रुग्णालयात उपचार सुरु
या हल्ल्यात दोघेही विद्यार्थी जखमी झाले आहेत. एका विद्यार्थ्याच्या बोटाला गंभीर दुखापत झाली. त्याला पुणे येथे अधिक उपचारासाठी हलवण्यात आले आहे. तर दुसऱ्या जखमीवर शिरवळ येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हल्ल्यानंतर काही वेळातच शिरवळ पोलिसांनी हल्लेखोर विद्यार्थ्याला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा सखोल तपास पोलीस करत आहेत.