वयात येणे नैसर्गिकच आहे, पण भावाला भलतेच वाटले, यानंतर घडू नये ते घडले !
वयात आल्यानंतर प्रत्येक मुलीला जे निसर्गाकडून वरदान मिळतं ते तिलाही मिळालं. पण हा अनुभव तिचा शेवटचाच ठरला. भावाच्या मनात नको ते आलं आणि उमलण्याआधीच तिचं अस्तित्व संपलं.
उल्हासनगर : मासिक पाळी हे स्त्रीला निसर्गाने दिलेलं वरदान आहे. मात्र हेच वरदान एका अल्पवयीन मुलीला शाप ठरलं आहे. उल्हासनगरध्ये एक भयंकर घटना उघडकीस आली आहे. एका 12 वर्षाच्या मुलीला पहिली मासिक पाळी आली होती. यामुळे तिच्या कपड्यांवर रक्ताचे डाग लागले होते. मात्र बहिणीच्या कपड्यांवर पाळीचे रक्त पाहून भावाच्या मनात भलताच संशय आला. बहिणीचे कुणासोबत तरी प्रेमसंबंध सुरु असून त्याच्यासोबत संबंध ठेवले, असा भावाच्या मनात संशय आला. यानंतर भावाने लहान बहिणीची जबर मारहाण करत हत्या केली. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी आरोपी भावाला अटक केली आहे. पोलीस चौकशीत भावाने हत्येची कबुली दिली आहे. ब्रिजेश शुक्ला असे अटक केलेल्या भावाचं नाव आहे.
पीडित मुलगी भाऊ आणि वहिनीसोबत राहत होती
शुक्ला कुटुंबीय मूळचे उत्तर प्रदेशातील रहिवाशी असून सध्या ते उल्हासनगरमध्ये राहतात. पीडित मुलीच्या आईचे निधन झाल्याने वडिलांनी तिची जबाबदारी मोठा भाऊ आणि वहिनीकडे सोपवली होती. पीडित मुलीला पहिली मासिक पाळी आली. मात्र मुलीला याची माहिती नसल्याने ब्लिडिंगमुळे तिच्या कपड्यांवर रक्ताचे डाग लागले होते. हे डाग पाहून वहिनीने भावाला नणंदेविरोधात चुकीची माहिती दिली. बहिणीबद्दल भावाच्या मनात संशय निर्माण केला.
वहिनीने भावाच्या मनात संशय निर्माण केला अन्…
बहिणीचे कुणासोबत तरी प्रेमप्रकरण सुरु असून त्यातून शारीरिक संबंध ठेवल्यानं हा रक्तस्त्राव होत असल्याचं वहिनीने सांगितले. यातून चारित्र्यावर संशय घेत तीन दिवस भाऊ बहिणीला अमानुष मारहाण करत होता. या मारहाणीमुळे मुलगी बेशुद्ध झाली. यानंतर भावाने तिला मध्यवर्ती शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. याप्रकरणी उल्हासनगर मध्यवर्ती पोलिसात हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपी भावाला अटक केली आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता, 12 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.