यूट्यूबवर फिल्म बघून रचला कट, पीएचडीच्या विद्यार्थ्याचे चार तुकडे केले; ‘असा’ अडकला पोलिसांच्या जाळ्यात
घटनेनंतर आरोपीने अंकितचा फोन बंद केला होता. वारंवार फोन बंद येत असल्याने आणि त्याच्याबाबत कोणतीही माहिती मिळत नसल्याने मित्र अस्वस्थ झाले. मित्रांनी त्याची शोधाशोध सुरू केली.
गाझियाबाद : उधार दिलेले पैसे परत करण्यासाठी तगादा लावणाऱ्या भाडेकरुचा घरमालकाने काटा काढल्याची घटना उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये घडली आहे. हत्या केल्यानंतर मृतदेहाचे चार तुकडे करुन आरोपीने विविध ठिकाणी फेकले. मात्र एका मॅसेजमुळे आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. यूट्युबवर फिल्म पाहून आरोपीने पोलिसांपासून बचाव करण्याची आयडिया घेतली. पण अखेर गुन्हा उघडकीस आला. उमेश शर्मा असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
गाझियाबादमधील मोदीनगर परिसरातील राधा एनक्लेव्ह येथे मयत अंकित खोखर भाड्याच्या घरात राहत होता. स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी उमेश शर्माने अंकितकडून पैसे घेतले होते. अंकित हे पैसे परत मागत होता.
यूट्युब पाहून रचला हत्येचा कट
पैशासाठी तगादा लावल्याने उमेशने यूट्युब फिल्म पाहून हत्येचा कट रचला. त्यानुसार 6 ऑक्टोबर रोजी अंकितच्या घरी गेला. त्यानंतर उमेश अंकितशी गप्पा मारायला लागला. गप्पा मारता मारता उमेशने संधी साधत अंकितचा गळा आवळला.
अंकितची हत्या केल्यानंतर उमेशने घरी जाऊन करवत आणली. नंतर करवतीने मृतदेहाचे चार तुकडे केले. त्यानंतर सर्व तुकडे सफेद पॉलिथीनमध्ये भरुन मित्राच्या गाडीतून नेले आणि वेगवेगळ्या ठिकाणी फेकले. डासनाजवळील मसुरी गंगानगरमध्ये हातपाय फेकले, ईस्टर्न पेरिफेरल एक्स्प्रेस वेवर डोके फेकले. तर खतौली येथे धड फेकले.
आरोपी ‘असा’ अडकला जाळ्यात
घटनेनंतर आरोपीने अंकितचा फोन बंद केला होता. वारंवार फोन बंद येत असल्याने आणि त्याच्याबाबत कोणतीही माहिती मिळत नसल्याने मित्र अस्वस्थ झाले. मित्रांनी त्याची शोधाशोध सुरू केली.
मित्रांनी अंकितच्या घरी फोन करुन चौकशी केली, मात्र तिथूनही काही सुगावा लागला नाही. अंकितच्या मोदी नगरमधील भाड्याच्या घरात जाऊन पाहिले मात्र तिथूनही काही कळले नाही. यानंतर मित्रांनी अंकित सर्च नावाचा व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करून त्याचा शोध सुरू केला.
हा ग्रुप नोव्हेंबर महिन्यात तयार करण्यात आला. दरम्यान, एक दिवस अंकितच्या नंबरवरून मित्राच्या मोबाईलवर मेसेज येऊ लागले, पण फोन केला असता कॉल आला नाही. त्यामुळे मित्रांना संशय आला आणि पोलिसांना माहिती देण्यात आली.
अंकितचे मित्र जेव्हा त्याचा शोध घेत त्याच्या भाड्याच्या घरात पोहोचले, तेव्हा घरमालक उमेश शर्माने त्यालाही असाच मेसेज आल्याचे सांगितले. यामध्ये मालकासाठी ‘तू’ हा शब्द वापरण्यात आला होता. त्यामुळे मित्रांना घरमालकावर संशय आला आणि त्यांनी पोलिसांना माहिती दिली.
अंकित तू या शब्दाचा वापरच करत नसल्याचे मित्रांनी सांगितले. त्यानंतर 12 डिसेंबर रोजी अंकितच्या मित्रांच्या माहितीवरून पोलिसांनी उमेशची चौकशी केली आणि प्रकरण उघडकीस आले. यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक करून घटनेचा छडा लावला.