पतीनेच पत्नीला संपवले, ‘असा’ झाला नवविवाहितेच्या हत्येचा खुलासा; कारण काय?
पोलिसांनी तपास केला असता, पती आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याने दोघांमध्ये वारंवार वाद होत असल्याची पोलिसांना माहिती मिळाली. हॉस्पिटलचा शवविच्छेदन अहवाल आणि पोलिसांना मिळालेल्या व्हॉट्सअप मॅसेज यावरून हत्येचा गुन्हा दाखल केला.
विरार / विजय गायकवाड (प्रतिनिधी) : व्हॉट्सअप स्टेटसवरून नवविवाहित महिलेच्या हत्येचा गुन्ह्याचा उलगडा करण्यास विरार पोलिसांना यश आले आहे. आरोपी पतीने आपल्या व्हाट्सअप स्टेट्सवर ‘आई वडील मला माफ करा, मी काही वेगळे काम करणार आहे’, असा मॅसेज ठेवला होता. याच मॅसेजचा धागा पकडून पोलिसांनी तपास केला असता हत्येचा उलगडा झाला आहे. चारित्र्याच्या संशयावरून मित्राच्या मदतीने पतीनेच पत्नीची गळा आवळून राहत्या घरात पत्नीची हत्या केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. प्रियंका उर्फ पिंकी पाटील असे हत्या झालेल्या 25 वर्षीय नवविवाहितेचे नाव आहे. पत्नीची हत्या केल्यानंतर पती फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
दोन दिवसापूर्वी राहत्या घरात आढळला होता मृतदेह
विरार पूर्वेच्या शंकर पाड्यातील जीवदानी अपार्टमेंटमध्ये 1 फेबुरवारी रोजी एका नवविवाहित महिलेचा तिच्या राहत्या घरात मृतदेह सापडला होता. महिलेचा मृतदेह मिळाला तेव्हा तिचा पती तिच्याजवळ नव्हता. तसेच त्याचा मोबाईलही बंद होता. त्यामुळे विरार पोलिसांना संशय आला होता.
व्हॉट्सअप स्टेटस आणि शवविच्छेदन अहवालाच्या आधारे गुन्हा दाखल
पोलिसांनी तिचा मृतदेह शवविच्छेदनसाठी मुंबईच्या जे जे रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी आरोपी पतीचा शोध घेत असताना व्हॉट्सअपच्या स्टेट्सवर त्याने आई वडील मला माफ करा, मी काही वेगळे काम करणार आहे, असा मॅसेज ठेवला होता.
चारित्र्याच्या संशयातून पतीने पत्नीला संपवले
यावरून पोलिसांनी तपास केला असता, पती आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याने दोघांमध्ये वारंवार वाद होत असल्याची पोलिसांना माहिती मिळाली. हॉस्पिटलचा शवविच्छेदन अहवाल आणि पोलिसांना मिळालेल्या व्हॉट्सअप मॅसेज यावरून हत्येचा गुन्हा दाखल केला.
विरार पोलिसांनी हत्येत मदत करणाऱ्या पतीच्या मित्राला अटक केले आहे. मात्र आरोपी पती अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.