मैत्रिणीशी जवळीक खटकली, अमेरिकेत 32 वर्षीय भारतीय इंजिनिअरची हत्या
गेल्या सहा वर्षांपासून शरीफ रहमान खान मिसौरीतील सेंट लुईसमध्ये नोकरीनिमित्त स्थायिक झाला होता (Indian Engineer Shot Dead)
सेंट लुईस : अमेरिकेतील मिसौरी (Missouri) भारतीय अभियंत्याची हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मध्य प्रदेशातील भोपाळचा रहिवासी असलेल्या 32 वर्षीय शरीफ रहमान खान (Sharif Rahman Khan) याची गोळी झाडून हत्या करण्यात आली. मैत्रिणीशी असलेली जवळीक खटकल्याने अमेरिकन नागरिकाने शरीफची हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. (Indian Engineer Shot Dead in USA Missouri in Suspected hate crime)
सेंट लुईसमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअरवर गोळीबार
शरीफ रहमान खान हा अमेरिकेत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून कार्यरत होता. गेल्या बुधवारी मिसौरीतील सेंट लुईसमध्ये युनिवर्सिटी सिटी अपार्टमेंटमध्ये त्याच्यावर गोळी झाडण्यात आली होती. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचारादरम्यान शरीफने अखेरचा श्वास घेतला.
मैत्रिणीशी जवळीक खटकल्याने हल्ल्याचा संशय
या प्रकरणाचा तपास करुन पोलिसांनी 23 वर्षीय कोल मिलर ( Cole J Miller) याला अटक केली. मयत शरीफ रहमान खान याच्या मैत्रिणीशी कोलची जवळीक असल्याचं पोलिसांनी सांगितलं. शरीफची मैत्रीण राहत असलेल्या युनिवर्सिटी सिटी अपार्टमेंटमध्ये कोल गेल्या बुधवारी गेला होता. त्यावेळी शरीफही तिथेच होता. तेव्हा दोघांमध्ये वादावादी झाली.
रागाच्या भरात शरीफने कोलला ठोसा लगावल्याचं बोललं जातं. त्यानंतर चिडलेल्या कोलने शरीफची पिस्तुल गोळी झाडून हत्या केल्याचा आरोप आहे. वंशवादातून (Hate crime) हे हत्याकांड घडल्याची चर्चाही काही ठिकाणी सुरु आहे. मात्र पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
मध्य प्रदेशात खान कुटुंबावर दुःखाचा डोंगर
गेल्या सहा वर्षांपासून शरीफ रहमान खान मिसौरीतील सेंट लुईसमध्ये नोकरीनिमित्त स्थायिक झाला होता. दरवर्षी ईदच्या निमित्ताने सुट्टी घेऊन तो मध्य प्रदेशातील घरी येत असे. मात्र त्याच्या अकाली निधनामुळे खान कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. चार दिवसांपूर्वी शरीफला एका तरुणाने गोळी मारल्याचं वृत्त कुटुंबाला मिळालं होतं. मात्र काल त्याच्या निधनाची दुःखद बातमी समजली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शरीफ रहमान खानवर अमेरिकेतच अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
संबंधित बातम्या :
मावशीवर जीव भाळला, शिव मंदिरात लग्नाची रेलचेल, ग्रामस्थांना कळताच गदारोळ, अखेर पोलिसांकडून तोडगा
प्रेयसीच्या घरी विद्यार्थी नेत्याची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये धक्कादायक आरोप
(Indian Engineer Shot Dead in USA Missouri in Suspected hate crime)