Indore Fire : इंदूरमध्ये सात जणांना जिवंत जाळणाऱ्याला अटक, मुलीने दगा दिल्याने केले कृत्य, पार्किंगमध्ये स्कूटीला लावली आग
एक पांढरा शर्ट घातलेला तरुण रात्री पार्किंगमधील गाडीला आग लावत असल्याचे सीसीटीव्हीत दिसले होते. त्यानंतर पोलिसांनी तपास करत 24 तासांत य़ा माथेफिरु तरुणाला गडाआड केले आहे. एका मुलीने दगा दिला म्हणून चिडलेल्या या तरुणाने हे कृत्य केले.
इंदूर – स्वर्ण बाग कॉलनीत पार्किंगमध्ये एका स्कुटीला (Indore Fire) आग लावून सात जणांच्या मृत्यूला (Fire Death) जबाबदार असलेल्या माथेफिरु तरुणाला पोलिसांनी (Indore Police) गजाआड केलं आहे. संजय उर्फ शुभम दीक्षित असं या तरुणाचं नाव आहे. त्याला शनिवारी रात्री पोलिसांनी अटक केली आहे. या इमारतीला लागलेल्या आगीत शुक्रवारी सात जणांचा मृत्यू झाला होता. ही आग शॉर्ट सर्किटने लागली असल्याचा पोलिसांचा पहिल्यांदा निष्कर्ष होता, मात्र सीसीटीव्ही तपासल्यानंतर यातील सत्य बाहेर आले. एक पांढरा शर्ट घातलेला तरुण रात्री पार्किंगमधील गाडीला आग लावत असल्याचे सीसीटीव्हीत दिसले होते. त्यानंतर पोलिसांनी तपास करत 24 तासांत य़ा माथेफिरु तरुणाला गडाआड केले आहे. एका मुलीने दगा दिला म्हणून चिडलेल्या या तरुणाने हे कृत्य केले. त्यात सात जणांचा नाहक बळी गेला आहे.
तरुणीवर प्रेम करीत होता
त्याच परिसरात राहणाऱ्या सोना नावाच्या मुलीशी आरोपीचे प्रेमसंबंध होते. त्याने तिच्यावर बरेच पैसे खर्च केले, नंतर ती आरोपीला मुर्ख बनवते आहे, हे त्याच्या लक्षात आले. ती अनेकांच्या संपर्कात असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यानंतर त्याने या तरुणीशी बोलणे टाकले, मात्र ती त्याचा पाठलाग करत राहिली. तिला अद्दल घडवण्यासाठी तिची स्कुटी जाळण्याचा आरोपी शुभमचा विचार होता. मात्र त्यातून मोठे अग्निकांड घडले आणि त्या सात निरपराधांचा बळी गेला.
तरुणीचे लग्न दुसरीकडे होत असल्याने होता राग
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा माथेफिरु त्याच इमारतीत आधी राहत होता. १० हजार रुपये आणि इतर प्रकरणांवरुन या तरुणात आणि तरुणीत वाद झाला. त्यानंतर संजयने सहा महिन्यांपूर्वी हे घर सोडले होते. त्याने इंदूरमध्ये अनेक ठिकाणी नोकऱ्या केल्य आहेत. आता त्याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
सीसीटीव्ही कॅमेराशी छेडछाड करण्याचाही प्रयत्न
शुक्रवारी रात्री तीनच्या सुमारास संजय पार्किंगमध्ये आला, त्याने एका वाहनातून पेट्रोल काढले आणि तिथेच आग लावल्याचे सीसीटीव्हीत स्पष्ट दिसते आहे. त्यानंतर हा तिथून बाहेर पडला. काही वेळाने तो पुन्हा तिथे आला आणि त्याने सीसीटीव्ही कॅमेरा तोडण्याचा प्रयत्न केला, इतकंच नाही तर त्याने वीजेच्या मीटरसोबतही छेडछाड करण्याचा प्रयत्न केला. या इमारतीतील सीसीटीव्ही जळाले होते, मात्र इतर इमारतींच्या सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीला गजाआड करण्यात पोलिसांना यश आले आहे.