Kalyan Crime : चूक कोणाची, शिक्षा कोणाला ? भटक्या श्वानांना खाऊ घालणाऱ्या प्राणीमित्राला बदडलं, पण का ?
मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून याप्रकरणी कल्याण महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुनील जाधव, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, कल्याण | 3 नोव्हेंबर 2023 : सध्या अनेक शहरात भटक्या कुत्र्यांचा त्रास वाढत आहे. त्यामुळे नागरिकांना मोठी गैरसोय आणि मनस्ताप सहन करावा लागतो. पण सगळेच भटके कुत्रे काही त्रास देणारे नसतात. तरीही काही लोक त्यांच्या खोड्या काढतात आणि त्यामुळे कुत्र्यांचा त्रास वाढतो. कल्याणमध्ये अशीच एक घटना घडली आहे, मात्र तेथे काही लोकांनी त्या श्वानांना नव्हे तर त्या त्या श्वानांना खायल घालणाऱ्या प्राणीप्रेमी इसमाला मारहाण केली आहे.
कोंबडी पळवत असल्याचा आरोप करत त्या माणसाच्या घरात घुसून त्याला मारहाण केल्याची घटना घडली आहे. दीपक दवे असे या प्राणी मित्राचे नाव असून या प्रकरणी दवे यांनी कल्याण महात्मा फुले पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
कशामुळे पेटला वाद ?
पीडित इसम दीपक दवे हे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या कचऱ्याच्या गाडीवर कंत्राटी कामगार म्हणून काम करतात. त्यांचं मुक्या प्राण्यावर अतिशय, निरपेक्ष प्रेम आहे. दिवसभर कठोर मेहनत करून काम केल्यानंतर दवे हे काही ओळखीच्या लोकांकडून खाद्य घेतात आणि रात्री त्यांच्या आसपासच्या परिसरातील कुत्र्यांना खायला घालतात. हा त्यांचा नित्यक्रम आहे. ते शहरातील जवळपास 00 पेक्षा अधिक भटक्या कुत्र्यांना दररोज खाऊ देतात. त्यामुळे त्यांच्या आसपास नेहमी कुत्र्यांचा वावर असतो.
मात्र याच परिसरात राहणारे किरण बांगर यांना हे बिलकूल आवडत नव्हतं. श्वानांना खायला देण्यावरून त्यांचं दवे यांच्याशी भांडणं झालं होतं. दोन महिन्यांपूर्वी किरण बांगर यांनी दीपक यांना मारण्याची धमकीदेखील दिली होती. तर दोन दिवसांपूर्वी त्यांच्या परिसरातील एका कुत्र्याने बांगर यांच्या कोंबडीचा पाठलाग करून तिच्यावर हल्ला केला. असा आरोप करत संतप्त बांगर हे दीपक दवे यांच्या घरात घुसले आणि त्यांनी दवे यांना बेदम मारहाण केली. दवे यांचं काहीएक ऐकून न घेता बांगर त्यांना मारतच सुटले.
मारहाणीची ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या दवे यांच्यावर तातडीने उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांनी कल्याणमधील महात्मा फुले पोलीस स्टेशन गाठून तेथील अधिकाऱ्यांना सर्व प्रकार सांगत तक्रार नोंदवली. याप्रकरणी पोलिसांनी बांगर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून ते पुढील तपास करत आहेत. या संदर्भात त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही तपासण्यात येणार आहे.