महावितरण कर्मचाऱ्यांच्या डोक्याला ताप, वीज चोरीचे तब्बल 105 प्रकरण, होणार मोठी कारवाई
थकीत बिलापोटी वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. मात्र त्यानंतर वीज ग्राहकांनी तो प्रताप केला तो पाहून महाविकरणच्या कर्मचाऱ्यांनीही डोक्याला हात मारुन घेतला.
सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण : टिटवाळ्यात वीज थकबाकीदार ग्राहकांचा प्रताप पाहून महावितरण कर्मचाऱ्यांच्या डोक्याला भलताच ताप झाला आहे. थकीत बिलापोटी वीज पुरवठा खंडित केल्यानंतर थकबाकीदार पुन्हा चोरून वीज वापरत असल्याचे उघड झाले आहे. महावितरण अधिकाऱ्यांनी टिटवाळा पट्ट्यातील 105 जणांविरूद्ध गुन्हे दाखल केले आहेत. टिटवाळा परिसरात महावितरणच्या पथकाची धडक कारवाई करत 54 लाख 56 हजार रुपयांची वीजचोरी उघडकीस आणली आहे. थकीत बिलापोटी वीज पुरवठा खंडित केल्यानंतर पुन्हा चोरून वीज जोडण्या करणाऱ्या अर्थात चोरून वीज वापरणाऱ्या टिटवाळा उपविभागातील 105 जणांविरुद्ध पोलीस ठाण्यात वीज चोरीचे गुन्हे दाखल केला आहे.
महावितरण पथकाकडून वीज पुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांची तपासणी
महावितरणच्या पथकाने टिटवाळा, मांडा, बल्याणी, अष्टविनायक चाळ, श्रीदेवी चाळ भागात थकबाकीमुळे कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित केलेल्या वीज ग्राहकांची तपासणी केली. कल्याण परिमंडळाचे मुख्य अभियंता धनंजय औंढेकर आणि कल्याण मंडळ 2 चे अधीक्षक अभियंता दिलीप भोळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहिम राबवण्यात आली. या तपासणीत 105 जणांकडून विजेचा चोरटा वापर सुरू असल्याचे आढळले.
मुरबाड पोलिसात गुन्हा दाखल
त्यानुसार संबंधिताना चोरीच्या विजेचे देयक आणि तडजोडीची रक्कम भरण्याबाबत नोटीस देण्यात आली. परंतु विहित मुदतीत रकमेचा भरणा न झाल्याने संबंधितांविरुद्ध मुरबाड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली. त्याप्रमाणे गुन्हा दाखल झाला असून, पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे या गुन्ह्याचा तपास करत आहेत.
थकबाकीपोटी एकदा वीजपुरवठा खंडित केल्यानंतर थकीत वीजबिलाचा भरणा आणि पुनर्जोडणी शुल्क भरल्याशिवाय संबंधित ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत केला जात नाही. अशा ग्राहकांनी परस्पर वीजजोडणी, शेजारी किंवा इतरांकडून वीज घेतल्याचे आढळल्यास संबंधित ग्राहक आणि त्यांना वीज पुरविणारा अशा दोघांविरुद्धही फौजदारी अथवा दंडात्मक कारवाई करण्यात येत असल्याचे महावितरणने स्पष्ट केले.