कुटुंब गाढ झोपेत असताना खिडकीचे ग्रील तोडून आत घुसायचा, घरातील लाखोंचा मुद्देमाल चोरुन पसार व्हायचा !
रात्रीच्या अंधारात घराचे कुलूप तोडून घरफोड्या करायचा आणि दागिने घेऊन आरोपी पसार व्हायचा. मात्र सीसीटीव्हीमुळे आरोपीचा पर्दाफाश झाला.
कल्याण / सुनील जाधव : कुटुंब रात्री गाढ झोपेत असताना ग्रील तोडून घरात प्रवेश करत लाखोंचा ऐवज चोरुन पसार होणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या चोरट्याकडून तीन घरफोड्यांचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. जावेद अख्तर मोहम्मद सलीम असे अटक चोरट्याचे नाव आहे. अटक करण्यात आलेला आरोपी सराईत चोरटा आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने महात्मा फुले पोलिसांनी चोरट्याला भिवंडीतून बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीकडून 6 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. हा चोरटा घरातील सोन्या-चांदीच्या दागिने, इतर मौल्यवान वस्तूंसह टीव्ही सुद्धा लंपास करायचा.
एका चोरी प्रकरणाचा तपास करताना घटना उघड
काही दिवसांपूर्वी कल्याण रामबाग परिसरात राहणारे एक कुटुंब घरात झोपले असताना खिडकीची ग्रील तोडून चोरट्याने घरात प्रवेश केला. घरातून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह इतर मौल्यवान वस्तू असा एकूण 5 लाख 79 हजार 505 रूपये किंमतीचे सामान चोरून नेला. याप्रकरणी कल्याण महात्मा फुले पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता.
सीसीटीव्हीच्या मदतीने चोरट्याला बेड्या
या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी कल्याण झोन 3 डीसीपी सचिन गुंजाळ, एसीपी उमेश माने-पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने क्राईम पीआय प्रदीप पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन पथके तयार करण्यात आली होती. या पथकांनी सतत 5 दिवस अथक परिश्रम घेत शहरातील अनेक सीसीटीव्ही फुटेज तपासले.
सीसीटीव्हीच्या मदतीने तांत्रिक माहिती आणि खबऱ्यांच्या माहितीवरुन कल्याण महात्मा फुले पोलिसांनी भिवंडीमधून जावेद शाहला ताब्यात घेतले. आरोपीची चौकशी केली असता आरोपीने कल्याणच्या रामबाग परिसरात दोन घरफोडी केल्याची कबुली दिली. तब्बल 6 लाख 24 हजार 355 रूपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने, मोबाईल, एलईडी टिव्ही, रोख रक्कम पोलिसांना दिले. सध्या पोलिसांनी या आरोपीला ताब्यात घेत आणखी किती ठिकाणी चोरी केली आहे. याचा तपास सुरू केला आहे.