जुना वाद उफाळून आला, मग मॅनेजर आणि वेटरले रस्त्यात गाठले अन्…
रात्री बार बंद करुन घरी जात असतानाच बार मॅनेजर आणि वेटरला तिघांनी रस्त्यात गाठले. दोघांवर हल्ला करुन आरोपी पसार झाले होते.
कल्याण : कल्याण डोंबिवली परिसरातील डान्सबार मॅनेजर आणि वेटरला रात्री रस्त्यात गाठून त्यांच्यावर शस्त्राने हल्ला करत लुटणाऱ्या तीन सराईत गुन्हेगारांना कल्याण क्राईम ब्रँचने अटक केली आहे. सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपींचा शोध घेत पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकल्या आहेत. नाबिर शेख, प्रेमकुमार गोस्वामी, सूरज विश्वकर्मा अशी या तीन लुटारूंची नावे आहेत. या तिघांविरोधात कोळशेवाडी, मानपाडा, खडकपाडा पोलीस ठाण्यात पाच गुन्हे दाखल आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी तीन मोटरसायकल, पाच मोबाईल फोन असा सुमारे पावणे दोन लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
कल्याण पूर्वेत काही दिवसांपूर्वी कशीष बारच्या मॅनेजरला मारहाण करत लुटल्याची घटना घडली होती. त्यापाठोपाठ याच हॉटेलच्या एका वेटरलाही रात्री एकटा गाठून घाटात मारहाण करून लुटपाट केल्याची घटना मानपाडा परिसरात घडली होती. या प्रकरणी पोलिसांचा शोध सुरू असतानाच पुन्हा कल्याण पूर्वेतील रंगीला बरच्या कर्मचाऱ्यांना देखील मारहाण करत लुटल्याची घटना घडली. यामुळे कल्याण डोंबिवली परिसरातील डान्सबारमधील कर्मचारी आणि मालकांमध्ये भीतीचे वातावरण होते.
क्राईम ब्रांचने अॅक्शन मोडमध्ये येत तपास सुरु केला
याच प्रकरणात कल्याण क्राईम ब्रँचने पण आपला तपास सुरू केला. कल्याण गुन्हे शाखा युनिट 3 च्या कर्मचाऱ्यांनी घडलेल्या सर्व ठिकाणचे सीसीटीव्ही तपासत आरोपींचा शोध सुरू केला. यातील तीन आरोपींना कल्याण आंबिवली परिसरातून ताब्यात घेतले. यातील एक आरोपी नाबीर शेख हा कल्याण पूर्वेतील कशीष बारमध्ये कामाला होता. याच दरम्यान त्याचा बार मॅनेजरसोबत किरकोळ वाद झाला होता. त्यानंतर त्याने बारमधले काम सोडून त्या बारमधील वेटर आणि मॅनेजरला धडा शिकवण्यासाठी आपल्या दोन मित्रासोबत एक गॅंग बनवली. बार मॅनेजरला आणि वेटरला एकट्यात गाठून त्यांच्यावर हल्ला करत त्यांच्याकडील मोटरसायकल, पैसे आणि मौल्यवान वस्तू घेऊन फरार झाले होते.
झटपट पैसा मिळवण्यासाठी लूट
मारहाण करून झटपट पैसा मिळत असल्याने या तिघांनी मिळून हा धंदा सुरू ठेवला. रात्री डान्सबारमधून पैसे घेऊन घरी जात असलेल्या वेटर मॅनेजर यांना रस्त्यात एकटा गाठून त्यांना मारहाण करत लुटण्यास सुरवात केली होती. सध्या सीसीटीव्हीच्या माध्यमातून कल्याण क्राईम ब्रँचने या तिघांना ताब्यात घेत या तिघांकडून तीन मोटरसायकल, पाच मोबाईल फोन असा सुमारे पावणे दोन लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.