मालक सतत वाद घालायचा, मग नोकराने अगदी काटा काढण्यासाठी परफेक्ट प्लानिंग केले, पण…
मालकाला आपल्या पत्नीचे आणि नोकराचे अनैतिक संबंध सुरु असल्याचा संशय होता. या संशयातून मालक दररोज काही ना काही कारणातून नोकराशी वाद घालायचा.
कल्याण / सुनील जाधव : मालक सतत वाद घालायचा म्हणून नोकराने आपल्या साथीदारांसोबत मिळून मालकाचा काटा काढल्याची घटना कल्याणच्या टिटवाळा परिसरात उघडकीस आली आहे. मालकाची हत्या करुन मृतदेह जमिनीत पुरला. पण मृतदेह फुगल्यानंतर हात जमिनीतून वर आला आणि हत्येचं भिंग फुटलं. याप्रकरणी पोलिसांनी सखोल तपास करत आरोपींना अटक केली आहे. न्यायालयाने तिन्ही आरोपींना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. सुनिल मौर्य, शुभम गुप्ता आणि अभिषेक मिश्रा अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
मालक आणि नोकरामध्ये सतत वाद व्हायचे
टिटवाळ्यातील सचिन म्हामाने यांच्या पत्नीचे इन्व्हर्टर आणि इलेक्ट्रिकचे दुकान आहे. या दुकानात सुनील मौर्य हा नोकर म्हणून काम करत होता. दुकानातील मालाच्या वसुलीचे काम सुनील करत असे. बिल वसुलीवरून मालक सचिन म्हामाने आणि नोकर सुनील मौर्य यांच्यात सतत खटके उडत असत. तसेच आपल्या पत्नी समवेत नोकर सुनिल याचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयाने पछाडलेल्या मालक आणि नोकरात नेहमी वादावादी सुरू होती. सततच्या होणाऱ्या वादामुळे नोकर सुनिल याने मालकाच्या हत्येचा कट रचला.
नोकर मालकाला बहाणा करुन जंगलात घेऊन गेला मग…
शुभम गुप्ता आणि अभिषेक मिश्रा या दोघा मित्रांना सुनीलने कटाची माहिती दिली. टिटवाळ्याजवळ असलेल्या दहागाव येथे एका फार्म हाऊसमध्ये इन्व्हर्टर आणि इलेक्ट्रिकचे काम करायचे आहे, असा बहाणा करत दुकान मालक सचिन यांना त्यांच्याच गाडीतून दहगाव येथे नेले. जंगलात पोहोचताच सुनिल याने डाव साधला. दोन साथीदार अभिषेक आणि शुभम यांच्या मदतीने सचिन यांना मारहाण त्यांची हत्या केली. त्यानंतर सचिन यांचा मृतदेह निर्जनस्थळी पुरला.
मृतदेहाचा हात जमिनीतून वर आला अन् सर्व बिंग फुटले
कुणाला संशय येऊ नये म्हणून त्यावर पाला-पाचोळा आणि मेलेल्या म्हशीचे अवशेष टाकले. मात्र दोन दिवसांनी मृतदेह फुगल्याने त्याचा एक हात जमिनीतून बाहेर आला. दरम्यान सचिन यांची गाडी तोडफोड केलेल्या अवस्थेत आढळली. या गाडीची माहिती कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन शोध सुरू केला. आजुबाजूला शोध घेतला असता जमिनीतून मानवी हात बाहेर आल्याचे दिसून आले.
मृतदेहाचे हात वर आल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह उकरून काढला. तर मृताची गाडी एक किलो मीटर अंतरावर आढळून आली. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवला. यानंतर पोलिसांनी वेगाने तपासचक्रे फिरवत मृतदेहाची ओळख पटवली. यानंतर पोलिसांनी हत्येचा उलगडा करत नोकरासह त्याच्या मित्रांना अटक केली.