Kalyan Crime : दोन दिवस करायचे बंद घराची रेकी, तिसऱ्या दिवशी थेट घरफोडी… सराईत चोरट्यांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
कल्याण पूर्वेकडे घरफोडीच्या घटनांमुळे खळबळ माजली आहे. बंद असलेल्या घराची सलग दोन दिवस रेकी करून तिसऱ्या दिवशी घरफोडी झाल्याची घटना उघडकीस आली होती. याप्रकरणातील दोन चोरट्यांना अखेर कल्याण पोलिसांनी अटक केली आहे.
सुनील जाधव, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, ठाणे | 28 नोव्हेंबर 2023 : कल्याण आणि डोंबिवली सध्या गुन्ह्याच्या घटनांनी हादरलं आहे. काही दिवसांपूर्वीच एका अल्पवयीन मुलीचे कल्याण स्थानकातून अपहरण झाले होते. ही घटना अद्याप ताजी असतानाच आता कल्याण पूर्वेकडे घरफोडीच्या घटनांमुळे खळबळ माजली आहे. बंद असलेल्या घराची सलग दोन दिवस रेकी करून तिसऱ्या दिवशी घरफोडी झाल्याची घटना उघडकीस आली होती. याप्रकरणातील दोन चोरट्यांना अखेर कल्याण पोलिसांनी अटक केली असून ते सराईत गुन्हेगार असल्याची माहितीही समोर आली आहे.
चोरी केलेले सोने विकून हे चोरटे गावी जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांच्या पथकाने सापळा रचून त्या दुकलीला बेड्या ठोकून अटक केली. तसेच त्यांच्याकडून पाच लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. भोलानाथ जैस्वाल आणि बाबू देवनाथ अशी दोन्ही चोरट्यांची नावे आहेत.
गुन्ह्याची कार्यपद्धती
भोलानाथ हा उत्तरप्रदेशात राहणारा असून बाबू हा बंगालचा रहिवासी आहे. हे दोघे चोरटे तीन दिवस आधीपासून इमारतीतील बंद घरांची रेकी करायचे, कुठल्या घरात चोरी करायची त्याचा प्लान आखायचे, त्यानंतर संधी साधत चोरी करून घरातील मौल्यवान वस्तू लंपास करायचे . अशी त्यांची गुन्ह्याची कार्यपद्धती होती.
दोन तीन महिन्यांपासून चोरीचे सत्र
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी परिसरात रात्री आणि काही ठिकाणी तर दिवसाढवळ्याही घरांमध्ये चोरीच्या घटना घडल्या होत्या. सातत्याने घडणाऱ्या या चोऱ्यांमुळे नागरिकही त्रस्त झाले होते आणि धास्तीचं वातावरण पसरलं होतं. याप्रकरणी अनेक तक्रारी आल्यानंतर कल्याणचे डीसीपी सचिन गुंजाळ, एसीपी कल्याणजी घेटे कोळसेवाडी पोलिस ठाम्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक राजेश शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक तयार करत आरोपींचा शोध सुरु केला.
काही चोरटे उल्हासनगरमध्ये एका ठिकाणी येणार असल्याची माहिती मिळाली खबऱ्यांकडून कोळसेवाडी पोलिसांना मिळाली. त्यांना जेरबंद करण्यासाठी पोलिस पथकाने लगेचच त्या ठिकाणी सापळा रचला आणि दोन चोरट्यांना अटक केली. ते सराईत गुन्हेगार असून पोलिसांनी त्यांचे पाच गुन्हे उघडकीस आणत पाच लाखाचा ऐवज हस्तगत केला आहे. त्यांनी याप्रकारे आणखी कुठे, किती चोऱ्या केल्या आहेत, याचा तपास पोलीस करत आहेत.