Kalyan Crime : कल्याण स्टेशन रोड बनलाय दारूचा अड्डा, भर रस्त्यात तळीरामांचा उच्छाद
कल्याण-डोंबिवलीत सतत काही ना काही गुन्हेगारी घटना उघडकीस येत आहेत. गुन्हेगारी रोखण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे आहे.
कल्याण / 2 ऑगस्ट 2023 : कल्याण स्थानक परिसरात गुन्हेगारी प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा, विशेषतः महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कल्याण स्टेशन रोडवर एकीकडे फेरीवाल्यांनी रस्त्यावर कब्जा केला आहे तर दुसरीकडे तळीराम रस्त्यावरच दारूच्या बाटल्या फोडताना दिसत आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून कल्याण स्टेशन रोड दारूचा अड्डा बनला आहे. या परिसरातून बाजारात येणाऱ्या, नोकरीला जाणाऱ्या महिलांच्या छेडछाडीच्या घटना वारंवार घडत होत्या. महापालिका अधिकारी आणि पोलीस याकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र दिसत आहेत. पोलिसांनी या तळीरामांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी महिला प्रवाशांकडून होत आहे.
रस्त्यावरच तळीरामांचा उच्छाद
कल्याण स्थानक परिसरात गुन्हेगारी प्रवृत्तीही वाढल्या आहेत. सतत चैन स्नॅचिंग, महिलांची छेडछाड अशा घटना कल्याण स्थानक परिसरात घडत असतात. आधीच फेरीवाल्यांनी केलेल्या अतिक्रमणामुळे नागरिकांना रस्त्याने चालणेही कठिण असताना आता तळीरामांनी रस्त्यावर उच्छाद मांडला आहे. या तळीरामांना कुणाचाही धाक नसल्याने बिनधास्त रस्त्यावर ठाण मांडून बसतात. यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा, महिलांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
पोलिसांच्या कारवाईकडे सर्वांचे लक्ष
नागरिकांना या तळीरामांमुळे नाहक त्रास होत आहे. तर दुसरीकडे कल्याण स्टेशन रोड जोशीबागकडे जाणाऱ्या रस्त्यावर स्टेशनला लागून असलेल्या स्कायवॉकच्या खाली मद्य विक्रीची आणि देशी दारूची दुकान थाटण्यात आली आहेत. फुटपाथवर बसूनच मद्यपी दारू पितात. संध्याकाळी 7 वाजल्यानंतर या रोडवरवरून महिला जाण्यास टाळतात. या रस्त्याला लागूनच मार्केट परिसर असल्याने महिलांना बाजारात जाणेही कठिण झाले आहे. आता पोलीस या तळीरामांवर आणि बेकायदेशीर दारु दुकानांवर काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.