चवीचवीनं शॉरमा खाणाऱ्यांनी ही बातमी वाचलीच पाहिजे! शॉरमा खाल्ला, पोट बिघडलं आणि जीवही गेला
Keral Killer Shawrma : तब्बेत बिघडली म्हणून सगळ्यांनाच रुग्णालयात दाखल करावं लागलं.
स्ट्रीट फुड (Street food) असलेल्या शॉरमाचा (Shawrma) चाहता वर्ग प्रचंड आहे. स्ट्रीड फुड विक्रेत्यांमध्ये दर चार किंवा पाच दुकानांमागे तुम्हाला शॉरमाचं दुकान आढळेलच आढळेल. पण चवीचवीन शॉरमा खाणाऱ्यांना धास्तावणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. घटना केरळची (Keral Killer Shawrma) आहे. केरळमध्ये काही विद्यार्थी शॉरमा खाऊन आले. घरी पोहोचले. सगळ्यांची तब्बेत बिघडली. तब्बेत बिघडली म्हणून सगळ्यांनाच रुग्णालयात दाखल करावं लागलं. यापैकी सगळ्यात धास्तावणारी बाब म्हणजे एका मुलीचा जीव गेल्यानं सगळेत हादरुन गेले आहेत. देवआनंदा असं मृत्यू झालेल्या 16 वर्षांच्या मुलीचं नाव आहे. आपल्या 16 वर्षांच्या मुलीचा शॉरमा खाऊन मृत्यू झाल्यानंतर तिच्या पालकांचं काय झालं असेल, याची निव्वळ कल्पनाही अंगावर काटा आणणारी आहे. या मुलीवर उपचार सुरु होते. पण उपचारादरम्यानच तिचा मृत्यू झालाय. एकूण 31 जणांना हा शॉरमा खाल्यानंतर त्रास जाणवू लागला होता. त्यानंतर या सगळ्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. कन्हानगडच्या स्थानिक रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
शॉरमातून विषबाधा…
शॉरमातून विषबाधा झाल्याची ही घटना रविवारी उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी हे दुकान चालवणाऱ्या दोघांवर कारवाई करत त्यांना ताब्यातही घेतलं. तसंच, त्यांचं दुकानंही बंद पाडलंय. शॉरमातून विषबाधा नेमकी कोणत्या कारणामुळे झाली, याचा शोध आता पोलिसांकडून घेतला जातो आहे. केरळचे स्थानिक पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
शॉरमा स्टॉलचा मालक परदेशात…
केरळच्या स्थानिक पोलिसांनी यासंपूर्ण प्रकरणी गंभीर दखल घेतली आहे. हे दुकान चालवणारा मालक परदेशात असल्याची माहिती समोर आली असून याप्रकरणी परदेशात असलेल्या या शॉरमा स्टॉलच्या चालकाला पोलिसांनी समन्सही पाठवलंय.
याप्रकरणी पोलिसांनी संदेश राय आणि अनास या दोघांना अटकक केली आहे. आयडियल फुड पॉईन्ट या ठिकाणी हे शॉरमा सेंटर चालवलं जात होतं. संदेश राय हा नेपाळी असून तो शॉरमा तयार करण्याचं काम करत होता. तर अनास शॉरमाचं स्टॉल सांभाळण्याचं काम करत होता. केरळ राज्यातल्या कसरगोड जिल्ह्यातील ही घटना घडली आहे.