पंधरा-वीस दिवस फरार राहिला, अखेर पहाटे पोलिसांनी घेरलं, आता कोर्टाकडून के पी गोसावीला आठ दिवसांची पोलीस कोठडी
क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात पंच असलेला के. पी. गोसावी अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. पुणे पोलिसांनी आज पहाटे त्याला बेड्या ठोकल्या. गोसावीवर नोकरी मिळवून देण्याच्या नावाने पैसे लुबाडल्याचा फसवणुकीचा गुन्हा दाखल होता.
पुणे : क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात पंच असलेला के. पी. गोसावी अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. पुणे पोलिसांनी आज पहाटे त्याला बेड्या ठोकल्या. गोसावीवर नोकरी मिळवून देण्याच्या नावाने पैसे लुबाडल्याचा फसवणुकीचा गुन्हा दाखल होता. तो क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात चर्चेत आल्यानंतर पीडित विद्यार्थी समोर आले होते. तेव्हापासून गोसावी फरार होता. अखेर पुणे पोलिसांनी आज पहाटे त्याला बेड्या ठोकल्या. पोलिसांनी आज त्याला कोर्टात हजर केलं असता कोर्टाने त्याला आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
प्रभाकर साईलच्या आरोपांनंतर के पी गोसावी मीडियासमोर
के पी गोसावी याच्या विरोधात चिन्मय देशमुख नावाच्या तरुणाने फसवणुकीची तक्रार पुणे पोलिसात दिली होती. त्याने नोकरीच्या आमिषाने चिन्मयकडून पैसे उकळले होते, असा आरोप चिन्मयकडून करण्यात आला होता. क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात गोसावीचं पंच म्हणून नाव समोर आल्यानंतर त्याच्याविरोधात फसवणुकीचा आरोप करणारे काही विद्यार्थी समोर आले होते. तेव्हापासून के पी गोसावी फरार होता. आर्यन खान प्रकरणात के पी गोसावीचा बॉडीगार्ड अशी ओळख सांगणाऱ्या प्रभाकर सईलने एनसीबीवर गंभीर आरोप केले होते. त्याने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर केला होता. त्या व्हिडीओत त्याने शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला सोडविण्यासाठी कथित 25 कोटीचं डील झाल्याचा दावा केला होता. या आरोपांमुळे मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर फरार असलेला गोसावी सोशल मीडिया आणि पत्रकारांशी फोनवर चर्चा करत समोर आला होता. त्याने प्रभाकरच्या सर्व आरोपांचे खंडन केलं होतं. तसेच आपण पोलिसांकडे सरेंडर होत असल्याचं सांगितलं होतं. पण वास्तव्यात तो सरेंडर झालाच नाही. अखेर पुणे पोलिसांनी मोठ्या शिताफीने त्याला कात्रजमधील एका लाँजवरून बेड्या ठोकल्या.
Maharashtra: Kiran Gosavi, arrested by Pune City Police on charges of cheating, has been sent to police custody for 8 days by a city court
Gosavi is a witness in drugs-on-cruise case involving actor Shah Rukh Khan’s son Aryan pic.twitter.com/WrqNj9uYRR
— ANI (@ANI) October 28, 2021
पुणे पोलिसांनी कशा बेड्या ठोकल्या?
पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पत्रकार परिषद घेऊन केपी गोसावीबाबतची माहिती दिली. गोसावीची एक तास कसून चौकशी केल्यानंतर तो कुठे कुठे लपला होता याची माहिती मिळाल्याचंही गुप्ता यांनी सांगितलं. गोसावी हा पुणे, मुंबई, लोनावळा, जळगाव, उत्तर प्रदेशातील फत्तेपूर, लखनऊ, तेलंगनातील हैदराबाद आणि मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये लपून बसला होता. तो वारंवार लपून बसत होता. त्यामुळे त्याला ट्रेस करणं कठीण जात होतं. मात्र, तो ज्या ज्या ठिकाणी लपून बसला होता त्या त्या ठिकाणी आमची टीम गेली होती. त्या ठिकाणी आमची टीम पोहोचली होती, असं सांगतानाच आज पहाटे 3 वाजात कात्रजमधील एका लॉजवरून त्याला अटक करण्यात आली, असं गुप्ता यांनी सांगितलं.
शरण आला नाही, एकट्यालाच अटक
गोसावीने शरणागती पत्करली नाही. त्याला अटक करण्यात आली आहे. त्याला एकट्यालाच अटक करण्यात आली आहे. त्याने शरणागती पत्करण्याबाबत आमच्याशी संपर्क साधला नव्हता. मीडियासोबत त्याचं काय बोलणं झालं हे आम्हाला माहीत नाही, असं त्यांनी सांगितलं. कोर्टाकडे त्याची पोलीस कोठडी मागण्यात येणार आहे. कोणत्या आधारावर आम्ही ही कोठडी मागू हे तुम्हाला कोर्टात गेल्यावरच कळेल, असंही त्यांनी सांगितलं.
हेही वाचा :
Aryan Khan Drugs Case : आर्यन खानला 25 दिवसांनी जामीन, आतापर्यंत नेमकं काय काय घडलं?