पाक कनेक्शन ते अंडरवर्ल्ड डॉन, अशी तयार झाली दाऊद इब्राहिमची डी-कंपनी
2008 मध्ये, फोर्ब्सच्या जगातील सर्वाधिक वाँटेड टॉप-10 गुन्हेगारांच्या यादीत तो चौथ्या क्रमांकावर होता. तर 2011 मध्ये फोर्ब्सने जाहीर केलेल्या यादीत दाऊद पहिल्या क्रमांकावर होता.
जयपूर : भारतातील मोस्ट वाँटेड गँगस्टर आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा शोध घेण्यासाठी देशातील अनेक तपास यंत्रणा वर्षानुवर्षे कार्यरत आहेत. जागतिक दहशतवादी घोषित होऊनही आतापर्यंत कोणताही देश त्याला पकडू शकला नाही. पाकिस्तानी क्रिकेटपटू जावेद मियांदादच्या संगतीमुळे दाऊद इब्राहिमला तेथे प्रोत्साहन मिळत असल्याचे जाणकारांचे मत आहे. दाऊद अनेक वर्षे पाकिस्तानात राहतोय आणि तपास यंत्रणांना गुंगारा देतोय. यावरुन दाऊदच्या ताकदीचा अंदाज येऊ शकतो. भारतातील मोस्ट वाँटेड गँगस्टर ते डी कंपनीचा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद कसा बनला माहितेय का?
मोस्ट वाँटेड कसा बनला?
मुंबईत 12 मार्च 1993 रोजी 13 सिरियल बॉम्बस्फोट झाले होते. या स्फोटांत 350 निष्पाप लोकांचा बळी गेला होता. तर 1200 हून अधिक लोक जखमी झाले होते. हे बॉम्बस्फोट घडवून आणण्यात दाऊद इब्राहिम दोषी आढळला होता.
या घटनेनंतर दाऊद भारत सरकारसाठी मोस्ट वाँटेड गुन्हेगार ठरला. यानंतर 2003 मध्ये भारत सरकारने अमेरिकेशी हातमिळवणी करत दाऊदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केले.
यानंतर 2008 मध्ये, फोर्ब्सच्या जगातील सर्वाधिक वाँटेड टॉप-10 गुन्हेगारांच्या यादीत तो चौथ्या क्रमांकावर होता. तर 2011 मध्ये फोर्ब्सने जाहीर केलेल्या यादीत दाऊद पहिल्या क्रमांकावर होता. तसेच काही मीडिया रिपोर्ट्समध्ये दाऊदचा 2008 मध्ये 26/11 च्या हल्ल्यात सहभाग असल्याचेही सांगण्यात आले होते.
असा बनला अंडरवर्ल्ड डॉन
दाऊद इब्राहिमचे वडिल मुंबई पोलिसमध्ये एक प्रामाणिक हवालदार होते. शहरातील डोंगरी भागात दाऊदचे संपूर्ण बालपण गेले. 1980 च्या दशकात हाजी मस्तान टोळीत सामील होत दाऊद मुंबईत सुरू असलेल्या टोळीयुद्धाचा एक भाग बनला.
मात्र काही दिवसांनी दाऊदचे हाजी मस्तानशी वैर निर्माण झाले, त्यामुळे दाऊद त्याच्या काही साथीदारांसह निघून गेला. हाजी मस्तान टोळी वेगळी झाली.
पठाण टोळी आणि हाजी टोळीला टक्कर देत दाऊद अधिक शक्तिशाली झाला. मुंबईत लोक दाऊदला घाबरू लागले. पठाण टोळीशी संबंधित बहुतेक लोक अफगाणिस्तानातील स्थलांतरित होते.
दाऊदच्या भावाची पठाण टोळीने हत्या केली. यामुळे दाऊदने पठाण टोळीचा बदला घेण्याचे ठरवले. याचाच परिणाम शहरात भयंकर रक्तरंजित टोळीयुद्ध सुरू झाले. दाऊदने हाजी टोळीतील सर्व सदस्यांची हत्या केली, त्यानंतर हाजी राजकारणात आला आणि दाऊद अंडरवर्ल्ड डॉन बनला.
अशी झाली डी-कंपनीची स्थापना
दाऊदने 1980 च्या दशकात एक संघटित गुन्हेगारी संघटना स्थापन केली. या कंपनीचे मीडियाने डी कंपनी नाव ठेवले. डी-कंपनी ही दक्षिण आशियातील सर्वात मोठी भूमिगत व्यवसाय संस्था मानली जाते, ज्याद्वारे खंडणी, सुपारी किलर, शस्त्रास्त्रांची तस्करी, अंमली पदार्थांची तस्करी आणि दहशतवादी कारवाया केल्या जातात.
गुन्हेगारी कारवायांव्यतिरिक्त दाऊदचा क्रिकेटमध्ये सट्टेबाजी आणि मॅच फिक्सिंगचाही मोठा व्यवसाय होता. 1985 मध्ये दुबईत क्रिकेट सामन्यांदरम्यान दाऊद स्टेडियममध्ये बसलेला दिसला होता.
याशिवाय दाऊदने बॉलिवूडमध्येही हात आजमावला. रिपोर्टनुसार दाऊद दुसऱ्याच्या नावावर चित्रपटांमध्ये पैसे गुंतवत असे. ‘चोरी चोरी चुपके चुपके’ हा डी-कंपनीच्या पैशातून बनलेला चित्रपट आहे.