माझ्या शेठला एक खोका दे अन्यथा…, जमिनीच्या वादातून व्यावसायिकावर प्राणघातक हल्ला
जमिनीच्या वादातून वसई तालुक्यात एक भयंकर घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
वसई : जमिनीच्या वादातून व्यावसायिकासह त्याच्या कर्मचाऱ्यांवर प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना वसई तालुक्यातील नायगावमध्ये उघडकीस आली आहे. हल्ला करुन आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यानंतर त्याने गाड्यांची तोडफोडही केली. हल्ल्याची सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. याप्रकरणी नायगाव पोलीस ठाण्यात 11 जणांवर भादवी कलम 307, 386, 143, 147, 148, 149, 452, 427, 504, 506 सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 135, शास्त्र अधिनियम 1959 चे कलम 4, 25 प्रमाणे नायगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. जितेंद्र रमाकांत यादव असे हल्ला झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे.
काय आहे प्रकरण?
जितेंद्र यादव यांचे नायगाव पूर्वेला जूचंद्र गावात बिंदशक्ती रिअल इस्टेट अँड इन्फ्रा प्रा. लि. नावाने कार्यालय आहे. गुरुवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास आरोपी या कार्यालयात आले. आरोपींनी जमिनीचे लिटीकेशन दूर करण्यासाठी माझ्या शेठला एक खोका द्यावा लागेल अन्यथा जीवे मारेन, अशी धमकी यादव यांना दिली. धमकी दिल्यानंतर जमीन व्यावसायिकासह कार्यालयातील कर्मचाऱ्यांवर तलवारीने वार करून कार्यालयासमोरील गाड्यांची तोडफोड केली. गाड्याच्या तोडफोडीची घटना सीसीटीव्ही कैद झाली आहे.
गिरीश नायर, अहमद शरीफ शेख, रियास शरीफ शेख, फिरोज शरीफ शेख, निलेश आनंदराव कांबळे, मोईउद्दीन उर्फ मनी सय्यद शेख, तेजस उर्फ टिप्पा दिलीप सोनवणे अशी हल्ला करणाऱ्या गुंडांची नावं आहेत. या घटनेने वसई विरारमध्ये पुन्हा एकदा गँगवॉर सुरू झाले की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.