पत्नीच्या चारित्र्यावर संशय, पतीकडून पोटच्या मुलीची पाण्याच्या हौदात बुडवून हत्या
पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन आरोपी पिता संतोष भोंडे हा घरात पत्नी-मुलांना नेहमीच मारहाण करायचा. पत्नी आणि आई-वडील शेतावर गेल्यानंतर घरात मुले खेळत असताना आरोपीने दीड वर्षांच्या चिमुकलीला मारहाण केली आणि हौदात फेकून दिले
लातूर : दीड वर्षांच्या चिमुकल्या मुलीची वडिलांनीच हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पित्याने मुलीला मारहाण केली. त्यानंतर पाण्याच्या हौदात फेकून पित्याने पोटच्या पोरीचा जीव घेतला. लातूर जिल्ह्यातील आशीवमध्ये ही दुर्दैवी घटना घडली आहे. पाण्यात बुडून चिमुकलीचा करुण अंत झाला. पोलिसांनी नराधम बापाला अटक केली आहे. (Latur baby girl killed by father after suspecting wife)
नेमकं काय घडलं?
पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन आरोपी पिता संतोष भोंडे हा घरात पत्नी-मुलांना नेहमीच मारहाण करायचा. पत्नी आणि आई-वडील शेतावर गेल्यानंतर घरात मुले खेळत असताना आरोपीने दीड वर्षांच्या चिमुकलीला मारहाण केली आणि हौदात फेकून दिले. पाण्यात बुडाल्याने चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. घरी परतल्यावर मुलांनी आई आणि आजी-आजोबांना ही घटना सांगितली. त्यानंतर भादा पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. आरोपी पित्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
कोरोना संसर्गाने मृत्यूचा बनाव
दुसरीकडे, मनाविरुद्ध लग्न केल्याच्या कारणावरुन आई-वडिलांनी पोटच्या मुलीची हत्या केल्याची घटना काही दिवसांपूर्वीच उत्तर प्रदेशात समोर आली होती. तरुणीने मे महिन्यात लग्न केलं होतं, मात्र काही दिवसांनी माहेरी आल्यानंतर तिचा गूढ मृत्यू झाला. पोटदुखीमुळे मुलीची प्रकृती बिघडली, तिला कोरोना संसर्ग झाला आणि तिचा मृत्यू झाला, असं तिच्या आई-वडिलांनी नवऱ्याला खोटं कळवलं. अखेर पालकांनीच तिची हत्या केल्याचं समोर आलं.
बहीण-भावाच्या वादात मध्यस्थी करणाऱ्या पित्याची हत्या
दरम्यान, पुण्यातील कात्रज-देहू रोड बायपसजवळ एका रहिवासी इमारतीत काम करणाऱ्या वॉचमनची गेल्या महिन्यात मुलाने हत्या केली होती. दोन मुलगे, दोन मुली आणि पत्नीसह इमारतीच्या पार्किंग लॉटमध्येच तो राहत होता. तो घरात कांदा चिरत बसला असताना त्याचा 13 वर्षांचा मुलगा आणि एक मुलगी भांडत असल्याचं त्याला दिसलं. त्याने दोघांचं भांडण सोडवत मध्यस्थी केली. वडील ओरडल्याचा राग मुलाला आला. त्याने वडिलांनी कांदा चिरण्यासाठी घेतलेली सुरी उचलली आणि त्यांच्याच पोटात खुपसली. एकच घाव वर्मी बसला आणि वॉचमन जागच्या जागी कोसळला. रुग्णालयात नेईपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.
संबंधित बातम्या :
डोक्यात दगड घालून अल्पवयीन मुलीची हत्या , बाथरूम शेजारी मृतदेह आढळल्याने खळबळ
लग्नासाठी नकार दिल्याने बापाकडून मुलीची हत्या, मृतदेह अर्धवट जळल्याने पुन्हा दफन
(Latur baby girl killed by father after suspecting wife)