आयफोन शोधता शोधता स्वीमिंग पूलपाशी पोहोचले, समोर तरंगताना आढळला…
लखनऊमधील एका रिसॉर्टमध्ये एक डॉक्टर त्याचे कुटुंबिय आणि मित्रांसह पार्टी करायला गेला होता. मात्र बराच वेळ होऊनही तो रूममध्ये परतला नाही, त्याच्या पत्नीॉने मित्रांकडे चौकशी केली असता...
माणसाच्या आयुष्याचा काहीच भरोसा नाही. कधी , कुठे आयुष्य संपेल याचा काही नेम नाही. असाच काहीसा प्रकार लखनऊमध्ये एका डॉक्टरसोबतही घडला. तेथील सरोजिनीनगर मधील एका रिसॉर्टमध्ये कुटुंबियांसह पार्टी करायला गेलेल्या डॉक्टरचा स्वीमिंग पूलमध्ये बुडून संशयास्पद मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस तेथे दाखल झाले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन तो पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून रिसॉर्टमधील इतर लोकही घाबरलेले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रदीप तिवारी असे मृत डॉक्टरचे नाव असून ते तालकटोरा येथील राजाजीपुरम येथील रहिवासी होते. त्यांचे घरातच क्लिनीक होते. घटनेच्या दिवशी प्रदीप हे त्यांची पत्नी, तीन वर्षांचा मुलगा आणि काही मित्र व त्यांच्या कुटुंबीयांसह दारोगा खेडा येथील मुकुंद माधव रॉयल हॉटेल अँड रिसॉर्टमध्ये पार्टीसाठी आले होते.
प्रदीप यांच्या मित्रांसोबत त्यांचे कुटुंबीयही आले होते. मिळालेल्या माहितीनुसार, सर्वजण प्रथम जेवले आणि सर्व पुरूष मंडळी स्विमींग पूलच्या दिशेने गेले. काही वेळाने सगळेजण आपापल्या रूममध्ये परत गेले, मात्र प्रदीप काही परत आला नाही. बराच वेल झाल्यानंतर अखेर त्याच्या पत्नीने बाहेर येऊन त्याच्या मित्रांकडे प्रदीपबद्दल चौकशी सुरू केली. पण कोणालाच त्याच्याबद्दल कल्पना नव्हती. अखेर सर्वांनी त्याचा शोध सुरू केला, थोड्या वेळाने सर्वजण स्विमींग पूलपाशी आले असता त्यांना तेथे पाण्यात प्रदीपचा मृतदेह सापडला. ते पाहून सर्वांनाच धक्का बसला.
तातडीने या घटनेची सूचना पोलिसांना देण्यात आली, पोलिसांनी लगेच घटनास्थळ गाठले आणि मृतदेह ताब्यात घेऊन तो पोस्टमॉर्टमसाठी पाठवून दिला. याप्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी नमूद केले. पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आल्यावरच मृत्यूचे कारण समजू शकेल असे पोलिसांनी स्पष्ट केलं.
आठ फूट खोल स्वीमिंग पूलमध्ये आढळला मृतदेह
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तो स्वीमिंग पूल आठ फूट खोल होता. तसेच मृत प्रदीप याला पोहताही येत नव्हतं, मात्र मित्रांच्या आग्रहाखात तो दारूच्या नशेत असतानाच तो पाण्यात उतरला होता. त्यावेळी त्याच्या मित्रांपैकी कोणाचा तरी आयफोन तेथेच पडला. पण रूमवर पोहोचल्यावर त्याच्या ते लक्षात आले. सर्वजण आयफोन शोधत असतानाच स्वीमिंग पूलजवळ पोहोचले तेव्हा त्यांना पाण्यात प्रतीकचा मृतदेह दिसला आणि ते हादरलेच .