तो आला, त्याने पाहिलं आणि बहिणीच्या चितेत मारली उडी! ज्योतीच्या सरणावरच करणनेही प्राण त्यागला
Madhya Pradesh Crime : बहिणीचा विहिरीत पडून मृ्त्यू झाल्याचं चुलत भावाला कळवण्यात आलं होतं.
चुलत बहिणीच्या मृत्यूनंतर (sister death) भावानं तिच्या चितेवर उडी घेत स्वतःलाही संपवून घेतलंय. बहिणीचा मृत्यू झाल्याचं कळल्यानंतर हा भाऊ (Brother) तब्बल 430 किलोमीटर बाईकवरुन प्रवास करुन आला होता. थेट तो स्मशानभूमीवर पोहोचला. बहिणीच्या चितेला त्याने नमस्कार केला आणि तिच्या जळत्या चितेवर उडी घेत स्वतःदेखील जीव दिलाय. चितेवर उडी घेतल्यानं गंभीररीत्या जखमी झालेल्या या भावाला रुग्णालयात घेऊनही जात होते. मात्र वाटेतच त्यानं अखेरचा श्वास घेतला. ज्या ठिकाणी बहिणीची मृत्यू झाला होती. तिथंच नंतर चुलत भावावरही अंत्यसंस्कार करण्याची दुर्दैवी वेळ एका कुटुंबावर आली. ही घटना घडली मध्यप्रदेशमध्ये (Madhya Padesh News). मध्यप्रदेशच्या मझगुवा गावात घडलेल्या या घटनेनं सगळेच हादरुन गेलेत.
बहिणीचा विहिरीत पडून मृ्त्यू झाल्याचं चुलत भावाला कळवण्यात आलं होतं. अत्यंत दुःखी झालेला भाऊ थेट गावाच्या दिशेनं निघाला. तब्बल 430 किलोमीटर बाईकवरन ते बहिणीच्या अंत्यसंस्काराच्या ठिकाणी पोहोचला. गुरुवारी हे अंत्यसंस्कार केले जात होते. त्यानंतर अवघ्या 36 तासांनी चुलत भावावरही त्याच ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले होते.
बहिणीचा कशामुळे मृत्यू?
21 वर्षांची ज्योती उर्फ प्रिती ठाकूर ही संध्याकाळी शेतात गेली होती. शेतात भाज्यांची लागवड करण्यात आलेली. त्यासाठी रोज संध्याकाळी ती शेतात जायची. पण गुरुवारी ती जी शेतात गेली, ती घरी पुन्हा परतलीच नाही. बराच वेळ झाला प्रिती आली नाही, म्हणून रात्री शोध घेण्यास सुरुवात करण्यात आली. पण प्रिती कुठेच आढळून आली नाही. ती मैत्रिणीकडे गेली असावी, असा विचार घरातल्यांनी केला. दरम्यान, सकाळी जेव्हा तिचे वडील शेतात गेले, तेव्हा त्यांनी विहिरीजवळ पाहणी केली. त्यांना शंका आली म्हणून त्यांनी विहिरीत शोध घेण्याचा प्रयत्नही केला. यावेळी प्रितीचा मृतदेह विहिरीत आढळून आल्यानंतर सगळेच हादरले होते.
का घेतली चितेवर उडी?
21 वर्ष प्रितीच्या मृत्यूबाबत तिचा चुलत भाऊ करण ठाकूरला कळवण्यात आलं. 18 वर्षांचा करण प्रितीच्या मृत्यूने हादरला होता. तो तडक बहिणीच्या मृत्यूची बातमी कळताच घराच्या दिशेने निघाला होता. 430 किलोमीटर बाईकवर प्रवास करत करत बहिणीच्या अंत्यसंस्कारासाठी पोहोचला. यावेळी त्याने प्रितीच्या चितेवरच थेट उडी घेतली आणि स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतला. त्यानं असा का केलं कळू शकलं नाही.
दरम्यान, चितेच्या आगीत होरपळल्यानं तो गंभीररीत्या भाजला गेला. प्रचंड जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जाण्यात आलं. पण वाटेतच त्याचा मृत्यू झाला. अखेर त्याच्या मृत्यूबाबत त्याच्या आईवडिलांना कळण्यात आलं. त्यानंतर रविवारी ज्या ठिकाणी प्रितीवर अंत्यसंस्कार करण्यात आले, तिथंच करणलाही अखेरचा निरोप देण्यात आला होता. यावेळी संपूर्ण गाव शोकाकूल झाला होता. आता पोलीस या दोघांच्या मृत्यूप्रकरणी चौकशी करत आहेत. नेमकं करणने असं का केल? प्रितीच्या मृत्यूचं गूढ काय आहे? या अनुशंगाने पोलीस तपास करत आहेत.