प्रियकरासाठी घरच्यांना सोडून गेली, दोन वर्ष लिव्ह इन मध्ये राहिली, मग…
तो रोज दुकानात यायचा. तिथेच दोघांची नजरानजर झाली. यानंतर ते समाजाची सर्व बंधनं झुगारुन सोबत राहू लागले. पण हे प्रेम फार काळ टिकू शकले नाही.
सागर : प्रियकराच्या प्रेमात आंधळी झालेल्या तरुणीचा भयंकर अंत झाल्याची घटना मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यात घडली. घरच्यांच्या विरोधात जाऊन तरुणी प्रियकरासह पळून गेली होती. जवळपास 2 वर्षांपासून दोघे जण लिव्ह-इन रिलेशनशीपमध्ये राहत होते. तरुणी प्रियकरावर लग्नासाठी दबाव टाकू लागल्याने प्रियकराने तिची हत्या केली. तो एवढ्यावरच थांबला नाही तर अंगावर पेट्रोल टाकून पेटवूनही दिले आणि मृतदेहाचा सांगाडा होईपर्यंत तसाच उभा राहिला. पुष्पेंद्र असे आरोपी प्रियकराचे नाव आहे. पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली आहे.
काजल असे मयत तरुणीचे नाव असून, ती हिरवार सागर येथील करापूर येथील रहिवासी होती. काजलच्या वडिलांना 5 मुली आहेत, त्यापैकी ती तिसरी होती. काजलच्या वडिलांचे घराबाहेर किराणा मालाचे दुकान होते. या गावातील पुष्पेंद्र या दुकानात जात असे. काजल अनेकदा गच्चीवर असायची आणि येथूनच काजल आणि पुष्पेंद्रची नजरभेट व्हायची. दोघेही एकमेकांना आवडू लागले. मग मोबाईल नंबरची देवाणघेवाण झाली आणि फोनवर बोलणे सुरू झाले.
अचानक एक दिवस काजल आणि पुष्पेंद्र गायब झाले. काजलच्या वडिलांनी मुलीचा खूप शोध घेतला. अनेक वेळा पोलीस ठाण्यात जाऊन मुलगी बेपत्ता झाल्याबाबत अर्ज दिला, मात्र काहीच झाले नाही. यानंतर प्रकरण सागर जिल्ह्याच्या एसपींकडे पोहोचल्यावर त्यांनी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली आणि स्टेशन प्रभारींना मुलीचा शोध घेण्याचे निर्देश दिले.
काजलला थाटामाटात लग्न करायचे होते
बहरिया पोलिसांनी मुलीचा शोध घेत वडिलांच्या ताब्यात दिले. मात्र काजल वडिलांसोबत जायला तयार नव्हती. तिने पुष्पेंद्रसोबतच राहणार असल्याचे स्पष्टपणे सांगितले. यानंतर ती पुन्हा तिच्या प्रियकरासोबत गेली. पुष्पेंद्र आणि काजलने औपचारिक लग्न झाले, पण तिला थाटामाटात लग्न करायचे होते. मात्र जातीच्या बंधनामुळे पुष्पेंद्र तसे करण्यास तयार नव्हता.
लग्नासाठी दबाव टाकत होती म्हणून हत्या
काजलने पुष्पेंद्रवर वारंवार लग्नासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली. याला कंटाळून पुष्पेंद्रने त्याचा चुलत भाऊ आणि मामासोबत मिळून काजलचा काटा काढण्याचे ठरवले. त्यानुसार पुष्पेंद्रने काजलला कारमध्ये फिरायला जाण्याच्या बहाण्याने सोबत नेले. वाटेत एका निर्जनस्थळी त्याने गाडी थांबवली आणि काजलची हत्या केली. हत्या केल्यानंतर करोहल गावातील जंगलात पुष्पेंद्रने काजलचा मृतदेह फेकून दिला आणि पेट्रोल ओतून पेटवून दिले.
‘असा’ झाला हत्याकांडाचा खुलासा
पोलिसांना गेल्या आठवड्यात हा सांगाडा मिळाला होता. घटनास्थळाची कसून झडती घेतली असता पोलिसांच्या हाती एक जळालेला मोबाईल सापडला. त्यात रणजित दांगीच्या नावाचे सिमही आढळले. रणजित हा मुख्य आरोपी पुष्पेंद्रचा चुलत भाऊ आहे. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता संपूर्ण प्रकरण उघड झाले. पोलिसांनी तिन्ही आरोपींना कर्रापूर येथून अटक करून बेगमगंज येथे नेले.