Mahadev App | बॉलिवूड सेलिब्रिटींची झोप उडवणारा महादेव बेटिंग ॲपचा प्रमोटर कोण ? ज्यूस आणि टायरचे दुकान ते मटका किंग ?
Mahadev online betting app Case : महादेव ऑनलाइन बेटिंग ॲप केसमध्ये ईडी बॉलिवूडमधील कलाकारांची चौकशी करण्यात येणार आहे. रणबीर कपूरसह बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी ईडीच्या रडारवर आल्याने एकच खळबळ माजली आहे. हे ॲप नेमके काय आहे, त्याचे प्रमोटर कोण हे सर्व जाणून घेऊया.
नवी दिल्ली | 7 ऑक्टोबर 2023 : महादेव बेटिंग ॲप प्रकरणात (Mahadev betting app) बॉलिवूडचे अनेक कलाकार (bollywood celebrities) ईडीच्या रडारवर आहेत. प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूर (ranbir kapoor) याला ईडीने समन्स बजावत चौकशीसाठी बोलावलं. रणबीरशिवाय बॉलिवूडच्या अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटींचं नाव या बेटिंग ॲप प्रकरणी समोर आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. ईडीने समसन्स बजावल्याने बॉलिवूडमधील अनेक कलाकारांच्या तोंडच पाणी पळालं आहे. दरम्यान सिनेसृष्टीतील अनेकांच नाव पुढे आल्याने या संपूर्ण प्रकरणाबद्दल लोकांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
महादेव बेटिंग ॲपच्या प्रमोटर्सपैकी एक असलेला सौरभ चंद्राकर हा याप्रकरणातील प्रमुख आरोपींपैकी एक आहे. एकेकाळी तो छत्तीसगडच्या भिलाईमध्ये ज्यूस आणि टायर्सचं दुकान चालवायचा. सौरभचे ज्यूसचे तर त्याचा साथीदार रवी उप्पलचे टायर-ट्यूबचे दुकान होते. एकेकाळी छोटं -मोठं दुकान चालवणारे हे दोघं मटका किंग कसे बनले ते जाणून घेऊया.
सौरभ चंद्राकर आणि रवी उप्पल हे महादेव बेटिंग ॲपचे दोन प्रमोटर्स आहेत. दोघांनाही सट्ट्याचा नाद होता, त्यातूनच त्यांची ओळख झाली. त्यानंतर दोघेही दुबईला गेले आणि तिथेच काही पार्टनरसोबत मिळून त्यांनी महादेव बेटिंग ॲप लाँच केले. बघता बघता दोघेही मटका किंग बनले.
लग्नामुळे चर्चेत आला सौरभ चंद्राकर
सौरभ चंद्राकर नुकताच त्याच्या लग्नामुळे चर्चेत आला. फेब्रुवारी 2023 मध्ये दुबई मध्ये झालेल्या लग्नसोहळ्यासाठी चंद्राकर याने पाण्यासारखा पैसा खर्च केला . बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी या सोहळ्यासाठी उपस्थित होते, त्यांनी परफॉर्मन्सही दिला. या लग्नात २०० कोटींहून अधिक खर्च करण्यात आला. या आलिशान लग्नसोहळ्याचा व्हिडीओ समोर आल्यानंतर त्यामध्ये परफॉर्म केलेले सेलिब्रिटी ईडीच्या निशाण्यावर आले आहेत.
कुटुंबियांना दुबईला नेण्यासाठी प्रायव्हेट जेट
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सौरभ चंद्राकरने या लग्नासाठी आपल्या कुटुंबातील सदस्यांना नागपूरहून यूएईला नेण्यासाठी खासगी जेट भाड्याने घेतले होते. लग्नासाठी मुंबईहून वेडिंग प्लानर, डान्सर आणि डेकोरेटर बोलावण्यात आले होते. हे सर्व पैसे रोख स्वरूपात देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. ईडीने याचे डिजिटल पुरावे गोळा केले आहेत.
या देशांमध्ये पसरलंय नेटवर्क
सौरभ चंद्राकर आणि रवी उप्पल हे ऑनलाइन सट्टेबाजीच्या दुनियेतील अशी दोन नावं आहेत, ज्यांचं नेटवर्क फक्त भारतातच नव्हे तर यूएई, श्रीलंका, नेपाळ आणि पाकिस्तानमध्येही पसरलं आहे.
अनेक सेलिब्रिटी ईडीच्या रडारवर
महादेव बेटिंग ॲप प्रकरणात अडकलेल्या सर्व सेलिब्रिटींची ईडीकडून चौकशी होणार आहे. रणबीर कपूर, श्रद्धा कपूर, कपिल शर्मा, मलायका अरोरा, सुनील शेट्टी, सोनू सूद, संजय दत्त, हार्डी संधू, सुनिल ग्रोव्हर, सोनाक्षी सिन्हा, रश्मिका मंधाना, सारा अली खान, गुरु रंधावा, टायगर श्रॉफ,, रफ्तार, एम्सी दिप्ती साधवानी, यांसारख्या अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटींची नावे समोर येत आहेत.