ज्या पुलामुळे आधी 4 शिक्षक गुदमरुन मेले, तिथंच आता पुन्हा दोन दुचाकीस्वार गेले, नेमकं काय घडलं?
हिंगोलीतील राज्य महामार्गावर घडलेल्या विचित्र अपघातामध्ये चौघा जणांना प्राण गमवावे लागले होते. सेनगावनजीक 13 जून रोजी रात्री उशिरा हा प्रकार घडला होता. हिंगोलीत अनेक ठिकाणी रस्त्याची कामे सुरु आहेत
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव एलदरी राज्य महामार्गवर खोदून ठेवलेल्या खड्ड्यात दुचाकी पडल्याने दोघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. सेनगावपासून काही अंतरावर राज्य महामार्गावर पुलाचे काम सुरु आहे, भर रस्त्यात काम सुरू असताना येथे दिशा दर्शक बोर्ड नसल्याने यापूर्वी सुद्धा चारचाकी या खड्ड्यात पडून चौघा जणांचा मृत्यू झाला होता. आता याच खड्ड्यात पडून दोघांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना रात्री घडली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. सकाळी वाहन धारकांच्या ही बाब लक्षात आली.
कार अपघातात शिक्षकांचा अंत
हिंगोलीतील राज्य महामार्गावर घडलेल्या विचित्र अपघातामध्ये चौघा जणांना प्राण गमवावे लागले होते. सेनगावनजीक 13 जून रोजी रात्री उशिरा हा प्रकार घडला होता. हिंगोलीत अनेक ठिकाणी रस्त्याची कामे सुरु आहेत. सेनगाव जिंतूर रस्त्यावरही काम सुरु असून त्यासाठी रस्त्यावर खड्डा खोदण्यात आला होता. मात्र, ठेकेदाराने रस्त्यावर दिशादर्शक फलक न लावल्यामुळे एक कार खड्ड्यात कोसळली होती.
नेमकं काय घडलं होतं?
पावसामुळे या खड्ड्यात पाणी साठले होते. अंधारात पाण्याने भरलेला खड्डा चालकाच्या नजरेला पडला नाही. त्यामुळे भरधाव कार वेगाने जाऊन खड्ड्यात पडली होती. कार खड्ड्यात पडल्यानंतर लगेच लॉक झाली होती. पाण्यात बुडलेल्या गाडीतून बाहेर पडता न आल्यामुळे चारही जणांचा गाडीतच गुदमरुन करुण अंत झाला होता.
दुचाकीस्वारामुळे घटना उघड
ही कार खड्ड्यात कोसळल्यानंतर बराच वेळ कोणालाही पत्ता लागला नव्हता. काही वेळानंतर एक दुचाकीस्वार याच मार्गावरुन जात होता. त्यावेळी रस्त्यावरील पाण्याने भरलेल्या खड्ड्यात त्याला कारच्या हेडलाईटचा प्रकाश दिसला. तेव्हा या दुचाकीस्वाराने जवळच्या एका धाब्यावर जाऊन या अपघाताची माहिती दिली. त्यानंतर घटनास्थळी रुग्णवाहिका आली आणि कारमधील चौघांनाही बाहेर काढण्यात आले. मात्र, रुग्णालयात नेईपर्यंत चौघांचाही मृत्यू झाला होता. चौघेही लोणार तालुक्यातील खळेगाव, पळखेडा येथील रहिवासी होते.
ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे अपघात
गेल्या दोन वर्षांपासून पुलाचं काम सुरु असूनही ठेकेदाराकडून रस्त्यावर कोणताही दिशादर्शक फलक लावण्यात आला नव्हता. रस्ता वळणाचा असल्याने वाहन चालकांच्या रस्ता सुरू असलेल्या पुलाचे काम लक्षात येत नाही. त्यामुळे या चौघांचाही बळी ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे गेला आहे. संबंधितावंर कठोर कारवाई व्हायला पाहिजे, अशी मागणी स्थानिक करत होते.
संबंधित बातम्या:
कार पाण्याने भरलेल्या खड्ड्यात कोसळली, गाडी लॉक झाली, पाण्यात बुडून चौघांचा अंत
Hingoli Accident | चौघा शिक्षकांच्या मृत्यूला कारणीभूत, हिंगोलीतील ‘त्या’ ठेकेदाराविरोधात गुन्हा