नांदेड-नागपूर हायवेवर ट्रॅक आणि एसटीची समोरासमोर धडक, 12 प्रवासी जखमी, ड्रायव्हरसह महिलेची अर्ध्या तासाने सुटका
तरुणांनी बसमध्ये अडकलेल्या चालकाला आणि एक प्रवाशी महिलेला बाहेर काढले. तसेच अपघातग्रस्तांना अँब्युलन्समध्ये पाठवून दिले. तसेच महामार्ग पोलिसांनी जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल केले.
नांदेड : नांदेड-नागपूर राष्ट्रीय महामार्ग (Nanded Nagpur National Highway) इथं आज ट्रॅक आणि एसटी महामंडळाच्या बसची समोरासमोर धडक झाली. या अपघातात बसमधील 12 प्रवासी जखमी (ST Bus Accident) झाले आहेत, तर चौघा जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना दोन 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिका आणि राष्ट्रीय महामार्गावरील वसमत फाटा येथील एक रुग्णवाहिका अशा तीन रुग्णवाहिकांच्या मदतीने नांदेडच्या शासकीय आणि खासगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी (Nanded Accident) दाखल करण्यात आले.
नांदेड-नागपूर राष्ट्रीय महामार्ग 361 वर पार्डी मक्ता गावाजवळ असलेल्या गुरुद्वाराजवळ नांदेड कडून हदगावकडे जाणारी बस (क्र. एम.एच -20 / बी. एल – 1707) आणि वारंगा कडून नांदेड जाणारा ट्रॅक (आर. जे – 42 / जि.बी – 7101) यांच्यात समोरासमोर भीषण अपघात झाला.
यावेळी शेतामध्ये काम करणारे शेतकरी श्याम मरकुंदे, नारायणराव देशमुख अपघात स्थळी धाव घेतली, मात्र बसचा चालक आणि एक प्रवासी महिला अडकून पडले होते. त्यांना काढण्यासाठी अर्धा तासाच्या वर अवधी लागला. या अपघातात ट्रॅक चालक आणि बस चालक दोघेही गंभीर जखमी झाले आहेत.
पार्डी मक्ता येथील तरुणांनी केली मदत
अपघाताची माहिती मिळताच अपघात स्थळी पार्डी म. येथील तरुण धावत गेले आणि बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना आणि बस चालकांना सुखरूप बाहेर काढले. यावेळी शंकर हापगुंडे, श्याम गिरी, गजानन हापगुंडे, मारोती कवडे, मुरलीधर कांबळे, प्रेम ठाकूर, चांदू कांबळे, बंडू मदने आदी तरुणांनी बसमध्ये अडकलेल्या चालकाला आणि एक प्रवाशी महिलेला बाहेर काढले. तसेच अपघातग्रस्तांना अँब्युलन्समध्ये पाठवून दिले. तसेच महामार्ग पोलिसांनी जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल केले.
रस्त्याचे काम सुरू असल्याने अपघात
नांदेड नागपूर या हायवेचे काम सध्या सुरू आहे, त्यातील नांदेड ते वारंगा या रस्त्याचे काम आता सुरू आहे, त्यामुळे इथल्या रस्त्यावरून एका साईडने वाहतूक सुरू आहे. त्यातच शेतीची मशागत सध्या सुरू आहे. त्यामुळे हा अपघात घडल्याचे सांगण्यात येतंय.