कुटुंबीयांचा लग्नाला विरोध, शाळेच्या नव्या इमारतीत प्रेमी युगलाचा गळफास
घराजवळ नवीन बांधकाम होत असलेल्या शाळेत मुकेश आणि स्नेहा गेले. तिथे छताला गळफास घेऊन दोघांनी एकत्रच आपलं आयुष्य संपवलं. जळगावात ही धक्कादायक घटना घडली आहे
जळगाव : लग्नाला विरोध झाल्याने प्रेमी युगलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शाळेच्या नव्या इमारतीत गळफास घेऊन दोघांनी आयुष्य संपवलं. जिन्यावर उभं राहून छताला गळफास दोघांनी जीवनाची अखेर केली. जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यात वाडे येथे आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
नेमकं काय घडलं?
मृत तरुणाचे नाव मुकेश कैलास सोनवणे (22 वर्ष) होतं. तर तरुणीचं नाव स्नेहा साखरे (19 वर्ष) होतं. मुकेश आणि स्नेहा या दोघांचं एकमेकांवर प्रेम होतं. मात्र त्याला कुटुंबातील सदस्य विरोध करत होते. विरोधामुळेच मुकेश आणि स्नेहा यांनी एकत्र आत्महत्या करण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप केला जात आहे.
शाळेच्या छताला गळफास
घराजवळ नवीन बांधकाम होत असलेल्या शाळेत मुकेश आणि स्नेहा गेले. तिथे छताला गळफास घेऊन दोघांनी एकत्रच आपलं आयुष्य संपवलं. पोलीस घटनास्थळी पोहोचले असुन पुढील सोपस्कार पूर्ण करण्यासाठी पंचनामा करुन दोघांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत.
पुण्यात प्रेमी युगुलाची आत्महत्या
दरम्यान, पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील पाटस येथील अल्पवयीन मुलगी आणि नानविज येथील 25 वर्षीय तरुण या दोघांनी एकत्र विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना काही महिन्यांपूर्वी समोर आली होती. त्या दोघांचं एकमेकांवर जीवापड प्रेम होतं. दोघांनी लग्न देखील करण्याचा निर्णय घेतला होता. पण त्यांच्या कुटुंबियांना ते मान्य नव्हतं. त्यामुळे दोघांनी संतापात विष प्राशन करुन आत्महत्या करण्याचा टोकाचा निर्णय घेतला. दोघांनी दौंड तालुक्यातील कुसगाव येथील जंगलात विष प्राशन करुन स्वत:ला संपवलं.
औरंगाबादेत प्रियकरापाठोपाठ प्रेयसीचा गळफास
दुसरीकडे, ज्या तरुणासोबत विवाह ठरला होता, त्यानेच आत्महत्या केल्यामुळे अल्पवयीन प्रेयसीनेही आपलं आयुष्य संपवल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी औरंगाबादमध्ये समोर आला होता. अवघ्या 15 दिवसांच्या अंतराने दोघांनी जीवनाची अखेर केली. प्रियकराच्या आत्महत्येनंतर तणावात असलेल्या अल्पवयीन मुलीने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली होती.
संबंधित बातम्या :
कुटुंबाचा प्रेमाला विरोध, प्रेमी युगुलाची गुढीपाडव्याच्या दिवशीच आत्महत्या