पोलीस महासंचालक पदक विजेता सहाय्यक फौजदार ACB च्या जाळ्यात, 40 हजारांची लाच घेतल्याचा आरोप
कोल्हापूर जिल्ह्यातील कुरुंदवाड पोलीस स्टेशनचा सहाय्यक फौजदार एसीबीच्या जाळ्यात अडकला. पोलिसासह आणखी एका व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडलं.
कोल्हापूर : कोल्हापुरातील सहाय्यक फौजदार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडला आहे. गुटखा कारवाईतील आरोपीला जामिनाला मदत करण्यासाठी पोलिसाने चाळीस हजार रुपयांची लाच स्वीकारल्याचा आरोप आहे. पोलीस महासंचालक पदक प्राप्त आरोपीची कारकीर्द वादग्रस्त राहिली आहे.
काय आहे प्रकरण?
कोल्हापूर जिल्ह्यातील कुरुंदवाड पोलीस स्टेशनचा सहाय्यक फौजदार एसीबीच्या जाळ्यात अडकला. पोलिसासह आणखी एका व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडलं. राजेंद्र उगलमुगले असं सहाय्यक फौजदाराचं नाव आहे, तर आप्पासाहेब मगदूम असं दुसऱ्या आरोपीचं नाव आहे.
वादग्रस्त कारकीर्द
राजेंद्र उगलमुगले याला गेल्या वर्षीच पोलीस महासंचालक पदक मिळालं होतं. वादग्रस्त कारकीर्द असलेला उगलमुगले अखेर लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात सापडला.
उस्मानाबादेत पोलीस लाच घेताना रंगेहाथ
याआधी, उस्मानाबादमधील येरमाळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गणेश मुंढे आणि पोलीस पाटील यांच्यावर अँटी करप्शन विभागाने कारवाई केली आहे. निनावी अर्जावर कारवाई न करण्यासाठी 1 लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे.
येरमाळा पोलिसात गणेश मुंडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. तडजोड अंती 70 हजार रुपयांची रक्कम स्वीकारण्याचे मुंडे यांनी मान्य केले होते. लाच मागितल्या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक, उस्मानाबाद विभागाने कारवाई केली.
विशेष म्हणजे या प्रकरणात पोलीस पाटील हा भागीदार व मध्यस्थी आहे. दरम्यान गणेश मुंडे व पोलीस पाटील हे दोघेही फरार आहेत. ज्या पोलीस ठाण्यात मुंडे कार्यरत होते तिथेच त्यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
एक लाखांच्या लाचेची मागणी
तक्रारदार यांच्या विरुद्ध आलेल्या निनावी अर्जावर कारवाई न करण्यासाठी गणेश मुंढे, स.पो.नि. पो.स्टे. येरमाळा यांनी रत्नापुर येथील पोलीस पाटील सुशन जाधवर यांचे मार्फ़तीने तक्रारदार यांच्याकडे 22 ऑगस्ट 2021 रोजी एक लाख रुपये लाचेची मागणी करून तड़जोडी अंती दोन्ही आरोपी यांनी 70 हजार रुपये लाच रक्कम स्वीकारण्याचे पंचांसमक्ष मान्य केले होते.
संबंधित बातम्या :
गोंदिया जिल्हाधिकाऱ्यांचा स्वीय सहाय्यक लाच घेताना रंगेहाथ, दहा हजार स्वीकारताना अटकेत
अनधिकृत बांधकाम वाचवण्यासाठी पैशांची मागणी; काँग्रेसच्या नगरसेवकाला लाच घेताना रंगेहाथ पकडले
एक लाखाच्या लाचेची मागणी, उस्मानाबादेत पोलीस निरीक्षकावर एसीबीची कारवाई