Suicide Attempt | सावकाराच्या जाचाला कंटाळून विषप्राशन, पंढरपुरात शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न
सावकाराच्या जाचाला कंटाळून पंढरपूर जवळच्या वाखरी येथील परमेश्वर पोरे या शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे.
सोलापूर : सावकाराच्या जाचाला कंटाळून शेतकऱ्याने आयुष्य संपवण्याचा प्रयत्न (Suicide Attempt) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शेतकऱ्याने विष प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपुरात (Solapur Pandharpur Crime News) हा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे शेतकऱ्याने विष प्राशन (Poison) करताना फेसबुक लाईव्ह केले होते. त्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र संतापाची लाट उमटली आहे. सावकाराने परस्पर शेत विकल्याच्या कारणावरुन शेतकऱ्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा आरोप आहे.
काय आहे प्रकरण?
मागील काही दिवसांपूर्वी पंढरपूर तालुक्यातील एका तरुण शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच, सावकाराच्या जाचाला कंटाळून पंढरपूर जवळच्या वाखरी येथील परमेश्वर पोरे या शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे.
लाईव्ह व्हिडीओ समाज माध्यमात व्हायरल
संबंधित शेतकऱ्याची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर पंढरपूर येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करत असल्याचा लाईव्ह व्हिडीओ समाज माध्यमात व्हायरल झाला आहे. या घटनेने पंढरपूर तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पंढरपूर ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
सावकाराने परस्पर शेत विकल्याने टोकाचं पाऊल
शेतकऱ्याच्या पोटी पुन्हा जन्माला येणार नाही, सरकार शेतकऱ्यांसाठी काहीही करत नाही असे म्हणत वैफल्यग्रस्त झालेल्या एका तरूण शेतकऱ्याने आत्महत्या केली होती. त्याचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटले होते. त्यानंतर आता सावकाराने परस्पर शेत विकल्याच्या कारणाने परमेश्वर पोरे या शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. विषारी औषध प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न करत असतानाचा व्हीडिओ व्हायला झाला आहे. या घटनेचा पोलिसांनी तपास सुरू केला आहे