नाकाबंदीवेळी बाईकस्वाराच्या डोक्यावर पोलिसाची काठीने मारहाण, युवक गंभीर जखमी
जखमी तरुणासोबत असलेला त्याचा मित्र कोळसेवाडी पोलीस स्टेशनमध्ये मारहाण करणाऱ्या पोलीस विरोधात तक्रार देण्यासाठी गेला असता पोलिसांनी तक्रार घेतली नाही, त्याला गप्प बसण्याच्या सल्ला देत हॉस्पिटलचा खर्च आम्ही देऊ असे सांगितल्याचा दावा केला जात आहे
कल्याण : नाकाबंदी दरम्यान फटाके घेण्यासाठी जाणाऱ्या एका तरुणाला पोलिसांकडून विनाकारण मारहाण केल्याची घटना कल्याणमध्ये समोर आली आहे. या घटनेत निलेश कदम नावाचा तरुण जखमी झाला असून विनाकारण मारहाण करणाऱ्या कोळसेवाडी पोलिसांवर कारवाईची मागणी केली जात आहे. मात्र या संपूर्ण प्रकरणावर पोलिसांनी काही बोलण्यास नकार दिला आहे.
नेमकं काय घडलं?
कल्याण पूर्वेतील चक्की नाका परिसरात राहणारे निलेश कदम, भुपेंद्र झुगरे हे दोघे सोमवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास दुचाकीने कल्याण पूर्व येथून उल्हासनगरच्या दिशेने जात होते. याच दरम्यान तिसगाव नाका येथे कोलशेवाडी पोलिसांची चेकिंग सुरु होती. निलेश आणि भुपेंद्र बाईकवर जात असताना एका पोलीस कर्मचाऱ्याने काठीने निलेश याच्या डोक्यात मारले.
युवक गंभीर जखमी
ही काठी निलेशच्या डोक्याला लागल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान या प्रकरणी निलेश सोबत असलेल्या त्याच्या मित्र भूपेंद्र कोळसेवाडी पोलीस स्टेशनमध्ये मारहाण करणाऱ्या पोलीस विरोधात तक्रार देण्यासाठी गेले असता पोलिसांनी तक्रार घेतली नाही, त्याला गप्प बसण्याच्या सल्ला देत हॉस्पिटलचा खर्च आम्ही देऊ असे सांगितल्याचा दावा केला जात आहे.
मुंबईत तृतीयपंथीयाची ट्राफिक पोलिसांना मारहाण
दुसरीकडे, ट्राफिक पोलिसांना मारहाण करणाऱ्या तृतीयपंथीयाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. पादचारी आणि रिक्षा चालकाच्या भांडणात पडून तृतीयपंथीयाने पादचाऱ्याशी वाद घातला होता. त्यांच्यात मध्यस्थी करायला आलेल्या वाहतूक पोलिसाला तृतीयपंथीयाने मारहाण केल्याचं समोर आलं होतं. मुंबईत काही दिवसांपूर्वी घडलेल्या घटने प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.
काय आहे प्रकरण?
मुंबईतील गोरेगाव भागात बांगुर नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी हा प्रकार घडला होता. तृतीयपंथीयाने केवळ पोलिसांनाच मारहाण केली नाही, तर वाहतूक पोलिसांची कॉलरही खुलेआमपणे ते ओढताना कॅमेरात कैद झाले होते. ट्रॅफिक पोलिसांसोबत केलेल्या या गैरवर्तनाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. व्हिडीओमध्ये किन्नर आपले कपडे काढून पोलिसांना मारहाण करताना दिसत आहे.
नेमकं काय घडलं?
बांगूर नगर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ऑटो रिक्षाला धडक दिल्यानंतर संबंधिक तृतीयपंथी रिक्षा चालकाच्या समर्थनार्थ आला आणि एका माणसाशी त्याने भांडायला सुरुवात केली. वाहतूक पोलीस हवालदार पादचाऱ्याच्या बचावासाठी गेला, तेव्हा तृतीयपंथीयाने पोलिसांनाही मारहाण करण्यास सुरुवात केली. या प्रकरणी पोलिसांनी तीन तृतीयपंथीयांना अटक केली आहे.
संबंधित बातम्या :
नाशिकमध्ये तृतीयपंथीयांचा राडा, टोलनाक्यावर प्रवाशांना शिवीगाळ-मारहाण, तुफान हाणामारीचा व्हिडीओ समोर
तृतीयपंथीयाला बेदम मारहाण करुन व्हिडीओ शूट, सराईत गुंडाची मुजोरी
VIDEO | कॉलर खेचून वाहतूक पोलिसाला तृतीयपंथीयाची मारहाण, मुंबईत तिघांना अटक