जेष्ठ नागरिकांना धक्का मारुन चाकूचा धाक दाखवायचा, मग लुटून मुद्देमाल घेऊन पसार व्हायचा !
कल्याणमध्ये जेष्ठ नागरिकांना मारहाण करुन लुटण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. महात्मा फुले पोलिसांनी आरोपीला पकडण्यासाठी परिसरात सर्च ऑपरेशन राबवले.
कल्याण / सुनील जाधव : कल्याण पश्चिम परिसरात रस्त्यावरून चाललेल्या जेष्ठ नागरिकांना धक्का मारत त्यांना चाकूचा धाक दाखवून लुटण्याच्या घटना वाढल्या होत्या. याप्रकरणी एका सराईत चोरट्याला कल्याण महात्मा फुले पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. शाहिद बेरिंग असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहेत. चोरी केलेला मुद्देमाल देखील कल्याण महात्मा फुले चौक पोलिसांनी हस्तगत केला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार शाहिद हा सराईत आरोपी असून, त्याच्यावर ठाणे जिल्ह्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. आरोपीने अशा प्रकारे अजून किती गुन्हे केले आहेत आणि यात कोण कोण सहभागी आहेत, याचा तपास महात्मा फुले पोलीस करीत आहेत.
कल्याण पश्चिमेतील जेष्ठ नागरिकाला लुटले
कल्याण पश्चिमेत राहणाऱ्या 60 वर्षीय अब्दुल हमीम गणी शेख हे रात्रीच्या सुमारास पायी घरी चालत जात होते. यावेळी आरोपी शाहिद बेरिंग याने शेख यांना जाणूनबुजून धक्का देत त्यांना मारहाण केली. तसेच त्यांच्यावर चाकूने वार करण्याचा प्रयत्न केला. चाकूचा धाक दाखवत त्यांच्याजवळील मोबाईल आणि रोख रक्कम काढून घेत आरोपी पसार झाला.
पोलिसांनी सर्च ऑपरेशन राबवत 24 तासात आरोपीला पकडले
यासंदर्भात अब्दुल हमीम गणी शेख यांनी कल्याण महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. शेख यांच्या तक्रारीची दखल घेत महात्मा फुले पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे पीआय प्रदीप पाटील, सहायक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे, भालेराव, पोलीस हवालदार चिते, कांगरे, थोरात, धाम्हणे या टीमने परिसरात सर्च ऑपरेशन राबवले. पोलिसांनी 24 तासाच्या आत कल्याण पश्चिम परिसरात सापळा रचून आरोपीच्या मुसक्या आवळल्या. आरोपी शाहिद बेरिंग याला अटक केली असून, त्याच्याकडून चोरी केलेला मुद्देमाल देखील हस्तगत केला आहे.