पुण्यात आयटी पार्कमध्ये आगडोंब, सुदैवाने जीवितहानी नाही, कारण अस्पष्ट
पुण्यात आयटी पार्कमध्ये भीषण आगीची घटना घडली आहे. अग्नीशमन दलाकडून बचाव कार्य सुरु आहे. घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
पुणे : पुण्यात आयटी पार्कमध्ये भीषण आगीची घटना घडली आहे. कल्याणीनगर येथील मारीगोल्ड आयटी पार्क येथे आगीची घटना घडली आहे. आगीचे नेमके कारण अद्याप कळू शकले नाही. अग्नीशमन दलाची चार वहाने घटनास्थळी दाखल झाली असून, आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. अग्निशमन दलाकडून उंच शिडीची ब्रॉन्टो आणि इतर चार अग्निशमन वाहने दाखल झाले आहेत. इमारतीत गच्चीवर अडकलेल्या 4 नागरिकांची सुटका करण्यात आली आहे. मात्र इमारतीच्या सहाव्या मजल्यावर आणखी काही नागरिक अडकले आहेत. त्यांना बाहेर काढण्याचे अग्नीशमन दलाचे प्रयत्न सुरु आहेत.
आयटी पार्कमधील आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं आहे. कंपनीच्या सर्व कर्मचाऱ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं आहे. सध्या कूलिंग ऑपरेशन सुरु आहे. तपासाअंतीच आगीचे खरे कारण समोर येईल.
आगीत दोन जण किरकोळ जखमी
पुण्यातील कल्याणीनगर येथील मारीगोल्ड आयटी पार्क येथे भीषण आग लागली होती. अग्निशमन दलाकडून उंच शिडीची ब्रॉन्टो व इतर चार अग्निशमन वाहनांच्या मदतीने इमारतीत गच्चीवर अडकलेल्या सर्व नागरिकांची सुटका केली आहे. या कंपनीत एकाच शिफ्टमध्ये 300 कर्मचारी काम करतात. त्या सर्वांना सुरक्षित बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश आलं आहे. यामध्ये दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत. तर अजून काही नागरिक अडकल्याची शक्यता आहे.