Kalash Yatra : मालाडमध्ये दोन हिंदू मुलांना मारहाण, मुख्य आरोपी आरशान शेख कोण?
"राऊत पत्राचाळ प्रकरणी जेलमध्ये गेले. आता त्यांनी एक पुस्तक लिहिले त्याचे नाव फार छान दिले आहे 'नरकातला स्वर्ग'. ते जेल मध्ये असताना वारंवार अर्ज करून बाहेर आले. खरंतर त्यांनी त्या जेलमध्ये अजून राहिलं पाहिजे होतं" असं संजय निरुपम म्हणाले.

गुढी पाडव्याच्या दिवशी मालाड पूर्वेला कलश यात्रेदरम्यान मोठा राडा झाला होता. पठाणवाडी येथे दोन हिंदू तरुणांना मारहाण झाली होती. दोन युवक भगवा झेंडा घेऊन रिक्षाने जात होते. त्यावेळी पठाणवाडी येथे त्यांचा एका समुदायासोबत वाद झाला. त्यांना रोखण्यात आलं, मोठा जमाव जमला. त्या दोन युवकांना मारहाण करण्यात आली. यानंतर हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. मॉब लिचिंगचा गुन्हा दाखल करुन आरोपींना अटक करावी अशी त्यांनी मागणी केली होती. पोलिसांना कारवाई करण्यासाठी दोन दिवसांचा वेळ दिला होता. अटक झाली नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेने दिला होता. पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत 7 जणांना अटक केली आहे.
आता शिवसेना नेते संजय निरुपम यांनी या प्रकरणी पत्रकार परिषद घेऊन काही गंभीर आरोप केले आहेत. “गुढी पाडव्याच्या दिवशी पठाणवाडीमध्ये घटना घडली. त्यातील मुख्य आरोपी आरशान शेखची परिसरात मोठी दहशत आहे. तो एका चाळीचा मालक आहे तिकडे मराठी आणि गुजराती लोक आहेत. त्याची आई आणि आरशान दोघेही त्रास देतात” असा आरोप संजय निरुपम यांनी केला. “त्याने अनधिकृत बांधकाम मोठ्या प्रमाणावर केले आहे. पालिकेने त्यावर कारवाई केली पाहिजे. कुरार पोलिसांवर मोठा दबाव आहे” असं संजय निरुपम म्हणाले.
‘पोलिसांनी कसल्याही दबावाखाली येऊ नये’
“दहा लोकांविरोधात तक्रार केल्यावर फक्त 7 लोकांना अटक केली आहे. त्यांना सोडवण्यासाठी रात्री मुस्लिम नेते जे उबाठा आमदाराचे कार्यकर्ते आहेत, रात्री 1 वाजे पर्यंत पोलिस ठाण्यात बसून होते. लोकल आमदाराचा पोलिसांवर दबाव आहे. कुरार पोलिसांनी कसल्याही दबावाखाली येऊ नये अशी आमची मागणी असून सर्व आरोपींना अटक करावी. पोलिसांवर दबाव टाकणारे लोक आमदाराचे कार्यकर्ते आहेत” असा दावा संजय निरुपम यांनी केला.
‘नुराणी मशीद अवैध’
“नुराणी मशीद अवैध आहे. त्या मशीद समोरून जाताना तरुणांनी जय श्री रामचे नारे दिले. पालिकेला सांगून त्या मशिदीची पाहणी करायला लावणार. राणी सती मार्गाचे रुंदीकरण झाले पाहिजे. त्या ठिकाणी असलेले अवैध बांधकाम काढले पाहिजे. आम्ही पोलिस ठाण्यात येऊ शकतो, बसू शकतो. स्थानिक आमदाराने दबाव टाकला तर आम्ही पण Action मध्ये येऊ” असं संजय निरुपम म्हणाले.
राऊतांनी पुस्तकाला छान नाव दिलं
“संजय राऊतानी काल म्हटले मोदी साहेबांचा वारस शोधण्याचे काम सुरू आहे. पण आज भाजपने सांगितले, 2029 मध्ये पण मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली भाजप निवडणूक लढवणार. त्यामुळे महाविकास आघाडीचे भविष्य काहीच नाही” अशी टीका संजय निरुपम यांनी केली.