Jalgaon Crime : बँकेत कामासाठी गेला पण नको ते उद्योग करून बसला… लपून-छपून तरूणीचे व्हिडीओ काढणाऱ्याची नागरिकांनी केली धुलाई !
एका खासगी बँकेत कामासाठी गेलेल्या तरूणाने बोलता बोलता तेथील महिला कर्मचाऱ्याचा व्हिडीओ काढण्यास सुरूवात केली. हा प्रकार लक्षा येताच इतर नागरिकांनी त्याला पकडून बेदम चोप दिला आणि पोलिसांच्या स्वाधीन केले.
जळगाव | 7 सप्टेंबर 2023 : आजकाल सर्वांच्या हातात मोबाईल दिसतो. लहान मुलं असोत की मोठी व्यक्ती , प्रत्येक जण मोबाईलचा वापर करताना दिसतात. मात्र काही लोकं मोबाईलचा गैरवापर करताना दिसतात. अशीच एक घटना जळगावात उघडकीस आली आहे. तेथे एक इसम बँकेत कामासाठी गेला पण नको ते उद्योग करून बसल्याने (crime news) नागरिकांचा चोप खाऊन आला. शौकत अली (वय ४२) असे व्हिडीओ काढणाऱ्या संशयित व्यक्तीचे नाव असून तो कासमवाडी येथे रहात असल्याचे समजते. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून त्याच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरूणी ही जळगावची रहिवासी असून ती एका खासगी बँकेत नोकरीला आहे. घटनेच्या दिवशी आरोपी शौकत अली हा बँकेत आला.त्याने पीडित तरूणीशी कामानिमित्त बोलायला सुरूवात केली. तिच्याशी बोलता बोलताच त्याने त्या तरुणीचे व्हिडीओ काढण्यास सुरुवात केली. त्या तरूणीच्या हा प्रकार लक्षात येताच तिने आरडाओरडा करण्यास सुरूवात केली. हे पाहून इतर नागरिकांनी आरोपीला पकडले आणि बेदम चोप देण्यास सुरूवात केली.
त्यानंतर त्यांनी आरोपी शौकत याला पोलिसांच्या स्वाधीन केलं, यावेळी पोलीस ठाण्यात मोठी गर्दी झाली होती. याप्रकरणी कर्मचारी तरुणीच्या तक्रारीवरुन शौकत अली विरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा मोबाईलही जप्त करण्यात आला आहे.