मणिपूर पुन्हा पेटले, पोलिसांवर गोळीबार, दगडफेक आणि जाळपोळ
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार न्यू मोरेह आणि एम चाहनौ गावाच्या प्रवेशद्वाराजवळ गोळीबार सुरू आहे. मोरेह येथे दोन घरांना आग लागल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मणिपूर | 30 डिसेंबर 2023 : मणिपूर राज्य विधानसभेच्या निवडणुका होऊन एक महिनाही पूर्ण होत नाही तोच मणिपूरमध्ये हिंसाचाराने पुन्हा थैमान घातले आहे. मणिपूरच्या मोरेह जिल्ह्यात पुन्हा एकदा हिंसाचार उफाळला आहे. येथे पोलिस दलावर अज्ञात बंदूकधाऱ्यांनी हल्ला केला. यात एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे. त्याचप्रमाणे अनेक ठिकाणाहून दगडफेक आणि जाळपोळ झाल्याच्याही बातम्या येत आहेत. शनिवारी दुपारी 3.50 च्या सुमारास मणिपूरच्या मोरेह येथे अज्ञात बंदूकधारी आणि पोलीस कमांडो यांच्यात जोरदार गोळीबार झाल्याचे वृत्त आहे.
मोरेह जिल्ह्यातील मोरे की लोकेशन पॉइंट (KLP) कडे जात असताना अज्ञात बंदूकधाऱ्यांनी पोलिस कमांडो घेऊन जाणाऱ्या वाहनांना लक्ष्य केले. या घटनेची माहिती देताना एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, ‘इम्फाळ-मोरेह मार्गावरील एम चहानौ गाव ओलांडताना हा हल्ला झाला. या हल्ल्यात एक पोलीस जखमी झाला. जखमी पोलीस कर्मचाऱ्यावर आसाम रायफल्सच्या पाच कॅम्पमध्ये उपचार सुरू आहेत,
गावाच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या व्यक्तीची हत्या
इंफाळ पश्चिम जिल्ह्यातील कडंगबंद गावाच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या एका व्यक्तीची शनिवारी पहाटे ३.३० च्या सुमारास अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली. जेम्सबोड निंगोम्बम असे मृत व्यक्तीचे नाव आहे. गावाच्या सुरक्षेसाठी तो तैनात होता. जवळ असलेल्या टेकडीवरून अतिरेक्यांनी त्याला गोळ्या घालून ठार केले अशी माहिती पोलिसांनी दिली.
निंगोम्बम यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी प्रादेशिक वैद्यकीय विज्ञान संस्थेत पाठविण्यात आला. कडंगबंद हे कांगपोकपी जिल्ह्याच्या सीमेवर आहे, ज्यात 3 मे रोजी राज्यात वांशिक हिंसाचार सुरू झाल्यापासून वारंवार हिंसाचाराच्या घटना घडत आहेत असेही पोलिसांनी सांगितले.