संभाजी मुंडे, टीव्ही 9 मराठी, परळी (बीड) : तुमच्या मुलीसोबत लग्न करतो. मला लातूरला हॉस्पिटल टाकण्यासाठी सात लाख रुपये द्या, असे म्हणून वैद्यकीय अधिकाऱ्याने परळीतील मुलीसाठी तिच्या कुटुंबीयांकडे मागणी घातली. मात्र साखरपुडा झाला, हुंडा दिल्यानंतर त्याने परस्पर दुसऱ्याच मुलीशी लग्न केलं, अशी धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी फिर्यादींच्या तक्रारीनुसार वैद्यकीय अधिकाऱ्यावर फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे (Medical officer taken dowry of 7 lakh rupees and married with another girl in Beed).
डॉ. संदीप वसंतराव मंत्रे असे त्या वैद्यकीय अधिकाऱ्याचे नाव आहे. तो सध्या लातूर जिल्ह्यातील साकोळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत आहे. मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीनुसार, गेल्यावर्षी 18 सप्टेंबर रोजी संदीप त्यांच्या घरी आला. मी सध्या वैद्यकीय अधिकारी असून मला लातूरला हॉस्पिटल टाकण्यासाठी सात लाख रुपये द्या. मी तुमच्या मुलीशी लग्न करतो, अशी त्याने मागणी घातली (Medical officer taken dowry of 7 lakh rupees and married with another girl in Beed).
मुलगा डॉक्टर आहे. स्वतः समोरुन मागणी घालत असल्याने स्वतःच्या मुलीचे भविष्य चांगले होईल, या आशेने वडिलांनी संदीप सोबत मुलीचे लग्न जमवले. 23 सप्टेंबरला दोन्हीकडील काही मोजक्या मान्यवरांच्या उपस्थितीत साखरपुडा पार पडला. त्यानंतर 21 ऑक्टोबरला मुलीच्या वडिलांनी ठरल्याप्रमाणे सात लाख रुपये संदीपच्या घरी नेऊन त्याच्या वडिलांकडे सुपूर्द केले आणि लग्न यावर्षी 5 मे रोजी करण्याचे ठरले.
त्यानंतर मुलीच्या वडिलांनी लग्नाची जोरदार तयारी सुरु केली. मंगल कार्यालय बुक झाले, लग्नपत्रिका छापल्या, इतर सर्व साहित्य खरेदी केले. मात्र, संदीपने 23 मार्चपासून त्याचा मोबाईल बंद केला. अखेर 4 एप्रिलला संदीपने दुसऱ्या मुलीसोबत लग्न झाल्याचे व्हॉट्सॲपवर व्हिडीओ क्लिपमध्ये सांगून या लग्नास नकार दिला. याप्रकरणी मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून डॉ. संदीप मंत्रे याच्यावर परळी शहर ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला.
केवळ लग्नास नकार देऊन संदीप शांत बसला नाही. माझे लग्न झाल्याचे सांगूनही माझा पाठलाग करण्यात येत आहे, लग्नासाठी माझ्या कुटुंबावर दबाव आणत आहेत, अशा आरोपांचा व्हिडीओ करून तो नातेवाईकात पाठवून मुलीची आणि तिच्या वडिलांची बदनामी करु लागला, असं फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, संदीपने हुंडा घेतलेल्या मुलीच्या कुटुंबियांना अंधारात ठेऊन दहा वर्षापासून ओळख असलेल्या मुलीसोबत लातूर जिल्ह्यातील रायवाडी येथील मंदिरात लग्न केले. याच मुलीसोबत लग्न करण्याचे निश्चित असतानाही संदीपने माझ्या मुलीसोबत विवाह करतो म्हणून सात लाख रुपये घेऊन फसवणूक केली, असा आरोप मुलीच्या वडिलांनी केला आहे.
हेही वाचा :
मायलेकाची हत्या करुन पतीची आत्महत्या? तपासाचे अनेक कंगोरे, पुण्यातील हत्याकांडाने पोलीसही चक्रावले